Solapur: मतिमंद मुलाच्या पालकांना मिळू शकेल कर्ज, पालकत्व तपासून निर्णय, 'शासन दिव्यांगाच्या दारी' उपक्रम
By शीतलकुमार कांबळे | Published: July 20, 2023 02:02 PM2023-07-20T14:02:19+5:302023-07-20T14:02:33+5:30
Solapur: कोणत्याही दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय व त्याच्या आर्थिक प्रगतीसाठी शासन कर्ज देते. याचा लाभ मतीमंद व्यक्तींना घेता येत नाही. मात्र, मतीमंद मुलाचे पालकत्व स्वीकारणाऱ्या पालकास मुलाच्या ऐवजी कर्ज घेता येणार आहे.
- शीतलकुमार कांबळे
सोलापूर - कोणत्याही दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय व त्याच्या आर्थिक प्रगतीसाठी शासन कर्ज देते. याचा लाभ मतीमंद व्यक्तींना घेता येत नाही. मात्र, मतीमंद मुलाचे पालकत्व स्वीकारणाऱ्या पालकास मुलाच्या ऐवजी कर्ज घेता येणार आहे. यासाठीची मदत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत होणार आहे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली.
मतीमंद मुलाच्या वतीने त्याच्या पालकांना कर्ज मिळणार असून कर्जाच्या परतफेडीस पालक जबाबदार असणार आहे. मुलाच्या वतीने आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार पालकांना मिळतो. यासोबतच मतीमंद मुलाचे पालकांना शासनाची पेन्शन असल्यास ती पेन्शन त्या मुलांना देण्याची तरतूद आहे. हा लाभ देण्यापूर्वी मुलाचे पालकत्व कुणाकडे आहे हे तपासण्यात येणार आहे.
यासंबंधीची सगळी मदत दिव्यांग आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत समाज कल्याण विभाग करणार आहे. यासाठी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा उपक्रम होणार आहे.