सोलापूरची ६९२ कोटींची पाणीपुरवठा योजना गतिमान, एनटीपीसी, स्मार्ट सिटी योजनेतील निधीचा होणार वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 09:32 AM2018-01-06T09:32:39+5:302018-01-06T09:36:58+5:30
शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ६९२ कोटींची योजना एनटीपीसी व स्मार्ट सिटी योजनेतील निधीच्या साह्याने मार्गी लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ६९२ कोटींची योजना एनटीपीसी व स्मार्ट सिटी योजनेतील निधीच्या साह्याने मार्गी लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
मनपाने यापूर्वी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी १२४० कोटींची योजना तयार केली होती. यात २०४५ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून प्रस्ताव तयार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी इतकी मोठी योजना साकार करण्यासाठी निधी देणे शासनाला शक्य नसल्याचे सांगून दोन टप्पे करण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार प्रशासनाने या योजनेतील काही भाग बाजूला ठेवून ६९२ कोटींची योजना तयार केली आहे. ही योजना मार्गी लावावी म्हणून महापौर शोभा बनशेट्टी यांनी दोनवेळा मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे. पण आहे त्या परिस्थितीत पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ही योजना वेगळ्या पद्धतीने मार्गी लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने केला आहे. याबाबत महापौर बनशेट्टी यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच हा प्रस्ताव जानेवारी महिन्याच्या सभेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
६९२ कोटींच्या योजनेतही दोन टप्पे करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कामानुसार खर्चाचे भाग पाडण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात जॅकवेल व पंपिंग हाऊसचे काम असेल. त्यानंतर उजनी ते पाकणी व सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम झाल्यावर पाकणी व सोरेगाव येथे जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी नवीन फिल्टर बेड तयार करावे लागणार आहेत. जलवाहिनी टाकताना भूमी अधिग्रहणाचा प्रश्न येणार आहे. त्यामुळे यासाठी पैसे लागणार आहेत. पण या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने येत्या तीन वर्षांत या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी जुन्या जलवाहिनीच्यावर नवीन जलवाहिनी टाकता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यात येत आहे. हे शक्य झाल्यास भूमी अधिग्रहणाचा प्रश्न व पैसे वाचणार आहेत.
------------------
अशी असेल खर्चाची तरतूद
च्११० एमएलडीची ६९२ कोटींची योजना साकारण्यासाठी पुढीलप्रमाणे तरतूद सुचविण्यात आली आहे. एनटीपीसीने पाणीपुरवठा योजनेसाठी २५० कोटी दिले आहेत. स्मार्ट सिटीत २०० कोटींची तरतूद आहे. असे ४५० कोटी व उर्वरित महापालिका आणि शासन मदतीतून ही योजना यशस्वी होऊ शकते, असा प्रशासनाचा दावा आहे. गरज पडल्यास महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड कंपनीकडून झीरो टक्के व्याजदराने कर्जही घेण्याचा प्रस्ताव आहे. ही योजना साकारण्यासाठी उपआयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांचे पथक काम करीत आहे.
-------------------
पाणी सोडण्याची कटकट जाणार
च्औज बंधाºयासाठी वर्षातून चारवेळा पाणी सोडले जाते. यासाठी दोन टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. पण एकावेळेस औज व चिंचपूर बंधारा भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाणी लागते. पण भीमेतून हे पाणी आणण्यासाठी उजनी धरणातून दरवेळेस पाच टीएमसी पाणी सोडावे लागते. त्यामुळे पाणी बिलाचा मोठा भुर्दंड महापालिकेला सहन करावा लागेल. ही जलवाहिनी झाल्यास भीमेत पाणी सोडण्याची मागणी करण्याची दरवेळची कटकट थांबणार आहे. त्याचबरोबर शहरासाठी पाणी वाढणार आहे. सध्याची उजनीची जलवाहिनीची क्षमता: ११० एमएलडी आहे. प्रस्तावित योजना: ११० एमएलडीची आहे. एकरुख योजना: १५ एमएलडीची आहे. टाकळी योजना: ८० एमएलडीची आहे. अशाप्रकारे शहराला ३१५ एमएलडी पाणी दररोज उपलब्ध होईल. ज्याचा उपयोग शहराची दररोजची गरज भागण्यासाठी होऊ शकणार आहे.