Solapur: पोलीस अन् एक्साइज डिपार्टमेंट अलर्ट; निवडणूक कर्नाटकची, तपासणी नाके सोलापूर जिल्ह्यात
By Appasaheb.patil | Published: April 26, 2023 01:17 PM2023-04-26T13:17:58+5:302023-04-26T13:18:42+5:30
Solapur: कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभाग व सोलापूर ग्रामीण पोलिस विभागाकडून सहा ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके सुरू केले आहे.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभाग व सोलापूर ग्रामीण पोलिस विभागाकडून सहा ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके सुरू केले आहे. या नाक्यावर प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे, तसेच अवैध मद्य वाहतुकीवरही लक्ष ठेवले जात आहे. यासाठी दुधाचे टेम्पो, भाजीपाल्यांच्या गाड्या, मालट्रका, आलिशान कार, जीपचीही कसून तपासणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील वागदरी (ता. अक्कलकोट), सादेपूर (ता. द. सोलापूर), हिळ्ळी (ता. अक्कलकोट), मरवडे (ता. मंगळवेढा), नांदणी (ता. द. सोलापूर), उमराणी (राज्य - कर्नाटक), उम्रज (रा. कर्नाटक), दुधनी (ता. अक्कलकोट) याठिकाणी तपासणी नाके आहेत. प्रत्येक तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दोन जवान, ग्रामीण पोलिसांचे तीन पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. रोख रक्कम, भेटवस्तू, दारूची तपासणी कसून करण्यात येत आहे.
कर्नाटक राज्यातील विधानसभेची सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून सोलापूर जिल्ह्यातील पाच किमी हद्दीतील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा या तालुक्यातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पारित केले आहेत. दरम्यान, नागरिकांनी त्यांच्या परिसरात दारू निर्मिती विक्री होत असल्यास त्याची माहिती या विभागास देण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी जनतेला केले आहे.