मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांविरुद्धचा तक्रारी अर्ज सोलापूर पोलीसांनी काढला निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:10 PM2018-06-12T13:10:18+5:302018-06-12T13:10:18+5:30
संबंधित तक्रार ही दिवाणी स्वरुपाची असल्याने दिवाणी न्यायालयात खटला दाखल करावा, असे लेखी पत्र फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून दिले आहे.
सोलापूर: अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून खोटे आश्वासन देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा मंत्र्यांविरुद्ध सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाईटवर राष्टÑीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांचा तक्रारी अर्ज पोलिसांनी तपास करुन निकाली काढल्याचे पत्र पाटील यांना दिले आहे.
संबंधित तक्रार ही दिवाणी स्वरुपाची असल्याने दिवाणी न्यायालयात खटला दाखल करावा, असे लेखी पत्र फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून दिले आहे.
पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज देण्याची योजना आहे. या योजनेसंबंधी राज्य शासनाचा अध्यादेशानुसार पवार यांनी १० लाख रुपये कर्जासाठी आॅनलाईन फॉर्म भरला होता. यानंतर मिळालेल्या पात्रता प्रमाणपत्र घेऊन ते बँकेत गेले मात्र तेथून बँकेकडून असा कोणत्याही स्वरुपाचे आदेश नसल्याचे स्पष्ट करीत कर्ज देण्यास असमर्थता दर्शविली.
यावर योगेश पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, एकनाथ शिंदे, संभाजी पाटील- निलंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवली होती.
यावर तक्रार अर्जातील मजकुराप्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंदला आहे. गैरअर्जदारास कलम १४९ च्या लेखी नोटिसीच्या माध्यमातून समज दिली आहे. अर्जातील मजकूर खरा नसल्याचे निष्पन्न झाल्याने अर्ज दप्तरी दाखल केला आहे. अर्जातील घटनेबाबत गुन्हा दाखल असल्याने अजरदाराचा अर्ज कागदपत्रांमध्ये समाविष्ट केला असून, अर्ज निकाली काढण्यात आला आहे. शिवाय अर्जातील तक्रार दिवाणी स्वरुपाची असल्याने दिवाणी न्यायालयात खटला दाखल करावा, असे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या सहीनिशी स्पष्टीकरण पाटील यांना पत्राद्वारे देण्यात आले आहे.
खटला दाखल करणार
- च्पोलीस आयुक्तालयाकडे मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांविरुद्ध केलेल्या तक्रारी अर्जाबद्दल फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडे पत्राद्वारे अर्ज दप्तरी दाखल केल्याचे म्हटले असून, त्यांच्याच पत्रातील मजकुरानुसार येत्या दोन दिवसात आपण सोलापूरच्या न्यायालयात फिर्याद देणार असल्याचे योगेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.