Solapur Politics; सुभाषबापूंशी तासभर गुप्त चर्चा झाल्यानंतर महास्वामींनी शिवायला टाकला भगवा नेहरू शर्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 01:48 PM2019-02-25T13:48:18+5:302019-02-25T13:54:16+5:30
जगन्नाथ हुक्केरी सोलापूर : आधी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर चर्चा झाली. संकेत मिळाले अन् धोरण ठरले. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष ...
जगन्नाथ हुक्केरी
सोलापूर : आधी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर चर्चा झाली. संकेत मिळाले अन् धोरण ठरले. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबर सोलापूरलोकसभा निवडणुकीबाबत तासभर गुप्त चर्चा झाली अन् गौडगाव मठाचे मठाधिपती शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी तडक मैंदर्गी गाठून सात-आठ भगवे नेहरू शर्ट शिवायला टाकले.
सोलापूर लोकसभेसाठी खा. अमर साबळे की डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी की पुन्हा विद्यमान खासदार अॅड. शरद बनसोडे अशी चर्चा सुरू होती. मात्र वरिष्ठ पातळीवरून चाचपणी झाल्यानंतर स्थानिक नेत्यांवर उमेदवारीचा भार सोडण्यात आला.
पालकमंत्र्यांनी महास्वामींशी चर्चा करून उमेदवारीचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी महास्वामींशी तासभर चर्चा केली. या बैठकीतला तपशील समजू शकला नसला तरी जात प्रमाणपत्र, प्रचाराची रणनीती, महाराज मंडळींचे सहकार्य या बाबींची चर्चा झाल्याचे समोर आले आहे. होटगी मठाचे मठाधिश धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्याशीही महास्वामींजींची सकारात्मक चर्चा झाली आहे.
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांचा सध्या भगवी बंडी आणि त्यावर उपरणे असा पेहराव आहे; मात्र प्रचारात हा पोशाख अडचणीचा ठरणार असल्याने बंडीसारखाच पण फुल बाह्याचा भगवा नेहरू शर्ट मैंदर्गी येथील टेलरकडे शिवायला टाकला आहे. त्यानंतर मैंदर्गीचे मठाधिपती नीलकंठ शिवाचार्य महास्वामी व नागणसूरचे मठाधिपत श्रीकंठ शिवाचार्य महास्वामींबरोबर त्यांनी तासभर चर्चा केली.
असा असणार शर्ट
- बंडीसारखीच उंची. पण फुल बाह्याचा भगवा नेहरू शर्ट असणार असून, मनगटाजवळ बाह्यांना गुंड्या नसणार आहेत. पण छातीवर शर्टाला गुंड्या असणार आहेत. अंगात भगवा नेहरू शर्ट असला तरी नेहमीप्रमाणे पंचाची लुंगीच ते परिधान करणार आहेत. नेहरू शर्टवर ते उपरणेही घालणार आहेत. जाकीटचा मोह त्यांना होणार नसल्याचे एका मठाधिपतींनी सांगितले. सहकारमंत्री व पालकमंत्र्यांबरोबर बैठक, जिल्हा व सीमावर्ती भागातील महास्वामींशी, मुख्यमंत्री कार्यालयातून आलेला फोन, मुंबई येथे भाजपच्या नेत्याबरोबर झालेला कार्यक्रम, हे महास्वामी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेतच देत आहे.
पालकमंत्र्यांसोबत बैठक
- पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर शेळगी येथील शिवयोगधाम येथे श्री. ष. ब्र. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, मैंदर्गीचे मठाधिपती श्री. ष. ब्र. नीलकंठ शिवाचार्य महास्वामींसह नागणसूरचे मठाधिपती श्री. ष. ब्र. श्रीकंठ शिवाचार्य, मंद्रुपचे श्री. ष. ब्र. रेणुक शिवाचार्य यांची बैठक झाली. यात मठाधिपतींनी सकारात्मक विचार करू, असे सांगितले.