Solapur Politics; परिचारक, संजयमामा, राऊत, जानकर एकत्र; भाजपचा उमेदवार ठरल्यानंतर घेणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 04:38 PM2019-03-03T16:38:36+5:302019-03-03T16:44:05+5:30
पंढरपूर : माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत काय भूमिका घ्यायची यावर विचारमंथन ...
पंढरपूर : माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत काय भूमिका घ्यायची यावर विचारमंथन करण्यासाठी जिल्ह्यातील समविचारी महाआघाडीतील नेत्यांनी पंढरपूरच्या अर्बन बँकेत शनिवारी रात्री बैठक घेतली आणि खलबते केली.
भाजपा सत्तेत आल्यापासून भाजपा नेत्यांच्या संपर्कात असलेले झेडपी अध्यक्ष संजय शिंदे, भाजपाकडून विधान परिषदेवर गेलेले प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आ. राजेंद्र राऊत, विजयराज डोंगरे, उत्तमराव जानकर, माजी आ. शहाजीबापू पाटील यांची पंढरपूर अर्बन बँकेत गुप्त बैठकीतून खलबते झाली.
माढा लोकसभेचे संभाव्य उमेदवार खा़ शरद पवार यांची झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली़ त्यानंतर त्यांनी माढ्यात स्वत: शरद पवार यांचे स्वागतही केले़ त्यामुळे ते पुन्हा राष्ट्रवादीत जाणार, अशी चर्चा असताना शनिवारी रात्री भाजपा नेत्यांची पंढरपूरमध्ये भेट घेऊन चर्चा केली.
संजय शिंदे यांच्या सहकार्यामुळे प्रशांत परिचारक हे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले तर आ़ प्रशांत परिचारक यांच्या सहकार्याने संख्याबळ कमी असतानाही संजय शिंदे हे झेडपी अध्यक्ष झाले़ राजकीय पटलावर एकमेकांना सहकार्य करून सत्ताधाºयांना जवळ केले़ आता निवडणुका जवळ आल्याने पुन्हा सत्तेचे गणित कशा पद्धतीने सोडवायचे याबाबत नक्कीच चर्चा झाली असणाऱ
शिवसेना आणि भाजपा यांची युती झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे़ तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याने ही जागा काँग्रेसकडे आहे़ त्यामुळे परिचारक यांना विधानसभा निवडणुकीपासून दूर रहावे लागेल़ त्यावर काय उपाय करता येईल, याबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
माढ्यामधून शरद पवार यांच्या उमेदवारीचे रश्मी बागल व त्यांच्या समर्थकांनी स्वागत क रून शुक्रवारी कार्यकर्ते, पदाधिकारी संवाद मेळावा घेतला. त्यास पवार यांनी हजेरी लावली. बागल गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. बागल यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनही झाले, पण बागल गटाने आयोजित केलेल्या मेळाव्यापासून झेड. पी. अध्यक्ष संजय शिंदे व मोहिते-पाटील गटाचे समर्थक चार हात दूरच राहिले. एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असणाºया स्व. नामदेवराव जगताप यांच्या तिसºया पिढीचे नेतृत्व करणारे करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे पुणे येथे दोन सप्ताहांपूर्वी भेटावयास गेले. त्यांना पवारांनी चांगला रिस्पॉन्स दिल्याने शरद पवार करमाळ्यात शुक्रवारी आल्यानंतर वैभवराजे यांनी पवारांची कमलाभवानी मंदिरात भेट घेऊन ‘पवार माझ्या आजोबासारखे’ असे म्हणाले होते.
करमाळ्यात पुन्हा स्वतंत्र मेळावा
- - माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करमाळ्यात सर्वच गटातटांना खूश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बागलांच्या मेळाव्यानंतर आता झेड. पी. अध्यक्ष संजय शिंदे मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. पुढच्या आठवड्यात पुन्हा माजी केंद्रीय कृषी मंत्री करमाळ््यात येणार आहेत.
- - शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघाचे २००९ ते २०१४ या कालावधीत खासदार होते. यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते व पवारांचे समर्थक विजयाची गणितंसुद्धा मांडू लागली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या हालचाली वेगात असल्या तरी स्थानिक नेतेमंडळींना विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाचीच कुणकुण लागल्याचे दिसून येते.