Solapur Politics; सोलापूर महापालिकेच्या कामावर भाजपचे नगरसेवकही समाधानी नाहीत; महेश कोठे यांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:45 AM2019-03-02T10:45:45+5:302019-03-02T10:48:44+5:30
सोलापूर : महापालिकेच्या कामावर शिवसेनाच नव्हे तर भाजपाचे नगरसेवकही समाधानी नाहीत. पण थेट शासकीय योजनेतून शहराच्या अनेक भागात भुयारी ...
सोलापूर : महापालिकेच्या कामावर शिवसेनाच नव्हे तर भाजपाचे नगरसेवकही समाधानी नाहीत. पण थेट शासकीय योजनेतून शहराच्या अनेक भागात भुयारी गटार, विजेच्या पोलसह इतर चांगली कामे सुरू आहेत. पुढील वर्षात यातून शहराचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी व्यक्त केला.
कोठे यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी त्यांनी मनपा सभेत हजेरी लावली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या सोलापूर दौºयात कोठे यांना काँग्रेसमध्ये घेण्याबाबत सूतोवाच केले होते. त्याचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते.
यापार्श्वभूमीवर कोठे यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपा-सेनेची युती झाली आहे; मात्र शिवसेनेचे नगरसेवक महापालिकेच्या कारभारावर नाराज आहेत. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत होईल का? असा प्रश्न विचारल्यावर कोठे म्हणाले, महापालिकेच्या कामावर शिवसेनाच नव्हे तर भाजपाचे नगरसेवक समाधानी नाहीत.
पहिल्यांदा असे घडले की निधीच मिळालेला नाही. दोन वर्षांनंतर लोकांसमोर जाताना काम काय केले हे सांगायचा प्रश्न प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांसमोर आहे. अविनाश ढाकणे यांनी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कठिण परिस्थितीत नगरसेवकांना निधी वाटला नसता तर शासकीय योजनांना हिस्सा देता आला नसता. नगरसेवकांना थेट निधी दिला काय किंवा अशा पद्धतीने दिला काय. शेवटी कामे होणारच आहेत.
लोकसभेसाठी भाजपासोबत बैठका होतील
- मी आजपर्यंत पक्षाशी कधीही गद्दारी केली नाही. ज्यावेळी ज्या पक्षात जाईन तो पक्ष आपला मानून काम केले. कधीही पक्षाच्या विरोधात काम केलेले नाही. हे मी वेगळं सांगायची गरज नाही. पक्षाची शिस्त मला पाळावी लागेल. मी पाळली नाही तर खालचे लोकही पाळणार नाही. सेनेतील नेतेही मला सहकार्य करीत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन मी काम करतोय. लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजपच्या नगरसेवकांच्या बैठका होतील.
मध्य, दक्षिणवर सेनेचा दावा
*- विधानसभा निवडणुकीत शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर हे मतदारसंघ शिवसेनेकडे येतील असे वाटते, असे कोठे यांनी सांगितले. दरम्यान, सहकारमंत्री सुभाष देशमुख दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तरीही सेना या जागेवर दावा सांगणार का? या प्रश्नावर कोठे म्हणाले, पूर्वीचा युतीचा पॅटर्न पाहिला तर दक्षिणची जागा सेनेकडे होती. बार्शी त्यांच्याकडे होती. जर बार्शी त्यांची मागणी तर दक्षिण आम्हाला मिळेल. आम्ही नवीन दावा करीत नाही. कारण ती जागा आमचीच आहे.