solapur politics : शहर उत्तर विधानसभेत पालकमंत्र्यांच्या विरोधात सहकारमंत्री गटाची मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 03:36 PM2018-12-05T15:36:28+5:302018-12-05T15:38:18+5:30
राकेश कदम । सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन टर्म निवडून येणाºया पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात ...
राकेश कदम ।
सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन टर्म निवडून येणाºया पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात यंदा नव्या फळीतील नेत्यांनी मोर्चबांधणी केली आहे. सुरेश पाटील यांच्या आरोपानंतर सहकारमंत्री आणि पालकमंत्री गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीत दिसतील, अशी शक्यता आहे.
शहर उत्तर हा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. परंतु, यंदा त्यांच्या विरोधात मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे. पालकमंत्री मात्र बिनधास्त आहेत. या ‘सेफ’ मतदारसंघातून ऐनवेळी पूत्र डॉ. किरण देशमुख यांना उमेदवारी देउन स्वत: अक्कलकोट किंवा दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा त्यांचे समर्थक करीत असतात.
दुसरीकडे सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणी प्रकरणावरुन जो संघर्ष झाला. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांना त्यासाठी गळ घातली जात आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी काडादी यांच्या निवासस्थानी जाउन चर्चाही केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'दादांनी' शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांना तयारी करण्याचा निरोप दिला आहे. त्यामुळे संतोष पवारांचे सोशल इंजिनिअरींग सुरू आहे. त्याच्यासोबत महेश गादेकर, मनोहर सपाटे यांचाही संपर्क सुरू आहे. सलग तीन टर्म नगरसेवक असलेले बसपाचे आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांविरोधात दंड थोपाटले आहेत.
दलित वस्त्यांमधील अखर्चित निधी, शहरातील समस्या यासह मिळेल त्या मुद्यावरुन ते पालकमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांची भूमिका महत्त्वाची असली तरी मधूनच त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा असते.
महापौर बंडखोरी करणार ?
- मूळ विजयकुमार देशमुख गटाचे पण ऐन निवडणुकीपूर्वी त्यांनाच हैराण करणारे भाजपा नेते सुरेश पाटील सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे सिध्द झाले आहे. सुरेश पाटलांनी आता आपला मोर्चा सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाकडे वळविला आहे. विषबाधा प्रकरणी त्यांनी संशयित म्हणून सहकारमंत्री गटाच्या नेत्या, महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, अविनाश महागावकर, अशोक निंबर्गी, नगरसेवक सुनील कामाठी यांची नावे घेतली आहे. या कारणामुळे दुखावलेला सहकारमंत्री गट इरेला पेटला आहे. पालकमंत्री देशमुख यांच्या विरोधात महापौर शोभा बनशेट्टी बंडखोरी करु शकतात, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.