solapur politics : सांगोला विधानसभेसाठी ९३ व्या वर्षीही गणपतरावांची उमेदवारी फिक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 03:41 PM2018-12-05T15:41:26+5:302018-12-05T15:42:58+5:30
शहाजीबापूही सातव्यांदा निवडणुकीसाठी तयार
अरुण लिगाडे
सांगोला : सांगोल्यातून विधानसभेसाठी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय) आघाडीकडून आ. गणपतराव देशमुख यांची उमेदवारी ९३ व्या वर्षीही फिक्स मानली जाते. तसेच माजी आ. अॅड. शहाजीबापू पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे-पाटील यांचे भवितव्य भाजपा, शिवसेना यांच्यातील युतीवरच अवलंबून आहे. जर शिवसेना स्वतंत्र लढली तर सांगोला विधानसभेचे चित्र वेगळेच राहणार आहे. निवडणुकीसाठी राजश्री नागणे-पाटील, कमरुद्दीन खतीब, भारत गवळी, मधुकर बनसोडे हेही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपकआबा साळुंखे इच्छुक आहेत. तशी त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आ. गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाकडून पुन्हा निवडणूक लढविणार आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आ. अॅड. शहाजीबापू पाटील सातव्यांदा निवडणूक लढविणार आहेत. सध्या ते कोणत्याच पक्षात नसले तरी त्यांची भूमिका वेट अँड वॉचची आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख भाजपाकडून सलग दुसºयांदा इच्छुक असून, त्यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे.
वैष्णवी महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागणे-पाटील याही निवडणूक लढविण्याच्या इराद्याने तयारीला लागल्या आहेत. भाजपाकडून उमेदवारी नाही मिळाली तर शिवसेनेकडून निवडणूक लढविणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे़ राष्ट्रीय समाज पक्षही सांगोला विधानसभेची जागा लढवणार असल्याचे सूतोवाच पक्षातील नेत्यांनी केले असून, पक्षाकडून सध्या तरी सोमा मोटे यांचे नाव चर्चेत आहे.
शिवसेना-भाजपा यांच्यात युती झालीच नाही तर शिवसेनेकडून कमरुद्दीन खतीब, भारत गवळी, मधुकर बनसोडे हेही इच्छुक असल्याचे समजते. मात्र आजपर्यंतच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांचा विचार करता खरी लढत विद्यमान आ. गणपतराव देशमुख, माजी आ. अॅड. शहाजीबापू पाटील या दोघांत झाली आहे.
माजी आ. अॅड. शहाजीबापू पाटील यांचा १९९५ चा विजय वगळता आ. गणपतराव देशमुख यांनी त्यांचा तब्बल सहा वेळा पराभव केला आहे. तर आ. गणपतराव देशमुख यांनी ९५ चा पराभव वगळता ११ वेळा सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे ते पुन्हा १२ व्या वेळेस निवडणूक लढविण्यास तयारीला लागले आहेत.