solapur politics : माळशिरसमध्ये उमेदवार कुणीही असला तरी केंद्रबिंदू मोहिते-पाटीलच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 03:48 PM2018-12-05T15:48:18+5:302018-12-05T15:51:32+5:30
राजीव लोहोकरे । अकलूज : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून दोन वेळा आ. हनुमंतराव डोळस ...
राजीव लोहोकरे ।
अकलूज : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून दोन वेळा आ. हनुमंतराव डोळस निवडून आले असून, आता हॅट्ट्रिक करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत़ तसेच मुंबईचे लक्ष्मण पाखरे हे देखील राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत़ भारतीय जनता पक्षाच्या वतीने माळशिरस पंचायत समिती सदस्य अजय सकट, रामभाऊ जगदाळे, अनंत खंडागळे, ज्ञानेश्वर कांबळे आदी इच्छुक आहेत.
माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे़ २००९ पासून हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे़ त्यापूर्वी मोहिते-पाटील विरुध्द विरोधक अशाच निवडणुका झाल्या आहेत. या मतदारसंघात गत दोन निवडणुकीत राष्ट्रवादीचे हनुमंतराव डोळस हे निवडून आले आहेत.
महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तम जानकर यांनी आपल्या सहकाºयांसह भाजपात प्रवेश केला. मात्र त्यानंतर त्यांचा करिष्मा कुठे दिसून आला नाही़ त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळविल आहे़ आगामी निवडणुकीसाठी विद्यमान आ़ हनुमंतराव डोळस यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे़ शिवाय राष्ट्रवादीकडूनच मुंबईचे लक्ष्मण पाखरे हे देखील इच्छुक आहेत़ त्यांनी उमेदवारांसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार व खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी जवळीक साधत पोस्टरबाजी केली आहे. पुण्याचे रामभाऊ जगदाळे यांनी देखील माळशिरसमधून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहे. मात्र त्यांचा अद्याप पक्ष नक्की नाही.
तसेच तरंगफळचे तृतीयपंथी सरपंच ज्ञानेश्वर (माऊली) कांबळे, अतुल सरतापे, गत निवडणुकीतील अपक्ष उमेदवार अनंत खंडागळे हे भाजपाकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादीला जोरदार टक्कर देण्यासाठी एकास एक उमेदवार म्हणून सध्या तरी शिवसेनेच्या गोटातून एकही नाव पुढे आले नाही, मात्र संधी मिळाल्यास गत निवडणुकीत मुंबई येथील शिवसेनेचे लक्ष्मण सरवदे यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते.