सोलापूरच्या वीज कर्मचाºयांचा कोकणात संघर्ष; भरपावसातही सेवा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:49 PM2020-06-26T12:49:08+5:302020-06-26T12:51:36+5:30
चक्रीवादळ : दोन अभियंत्यांसह १२ जनमित्रांचा समावेश, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू
सोलापूर : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या वीज यंत्रणेची पुन्हा उभारणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे १४ अभियंते व कर्मचारी संततधार पावसात कोकणातील दापोली परिसरात (जि. रत्नागिरी) युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करीत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या सोलापूर शहर व ग्रामीण तसेच बार्शी विभागातील दोन अभियंता व १२ जनमित्र दापोली तालुक्यातील हर्णे येथे वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे. समुद्रकिनारी असलेल्या या गावातील सुमारे ९५ टक्के वीज यंत्रणा चक्रीवादळाने जमीनदोस्त झाली आहे. कोरोनामुळे बाहेर जिल्ह्यातील मजूर उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांच्या मदतीने वीज यंत्रणा उभारण्याचे काम सुरु आहे. यामध्ये नवीन वीज खांब रोवणे, वीज तारा ओढणे, खड्डे करण्यापासून वीज खांबांची खांद्यावरून वाहतूक करण्यापर्यंत सर्व कामे महावितरणचे कर्मचारी करीत आहेत.
या दुरुस्ती कामादरम्यान संततधार पाऊस हजेरी देत असल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत वीज यंत्रणेची कामे करावी लागत आहेत. मात्र चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न अभियंते व कर्मचाºयांकडून सुरु आहेत. या पथकांमध्ये सहायक अभियंता दाऊद तगारे (सोलापूर), कनिष्ठ अभियंता रमेश लोकरे (बार्शी) तसेच गोपाळ बार्शीकर, प्रमोद जगदाळे, पिराजी माने, आरिफ शेख, सचिन कानडे, बिलाल चाऊस, बजरंग अवताडे, शरणप्पा दड्डे, राजेंद्र बोधले (सर्व सोलापूर), श्रीपती आवटे, संदीप देठे, अमोल पाटील (सर्व बार्शी) यांचा समावेश आहे.
गेल्या ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाचा कोकणच्या किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. प्रामुख्याने रायगड व रत्नागिरीसह इतर काही जिल्ह्यांतील वीज यंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ७८०० वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी इतर जिल्ह्यातून महावितरणचे अभियंते व कर्मचाºयांचे पथके पाठविण्याचे निर्देश दिले होते.
कोकणात चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे़ कोकणातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सोलापुरातील बार्शी व सोलापूर शहरातील अभियंते, जनमित्र कोकणात सेवा देत आहेत. भर पावसातही विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम अहोरात्र सुरूच आहे़
- ज्ञानदेव पडळकर,
अधीक्षक अभियंता, महावितरण