Solapur: सोलापूर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचा पदभार प्रसाद मिरकले यांच्याकडे
By Appasaheb.patil | Published: March 20, 2024 09:06 PM2024-03-20T21:06:14+5:302024-03-20T21:06:27+5:30
Solapur News: सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या निलंबन कारवाईनंतर महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख प्रसाद मिरकले यांच्याकडे समाजकल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या निलंबन कारवाईनंतर महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख प्रसाद मिरकले यांच्याकडे समाजकल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे. हा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बुधवारी घेतला आहे.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. मात्र, सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ५० लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान जमा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. याबाबत चौकशी सुरू असतानाच सीईओ आव्हाळे यांनी विभागीय चौकशीचा प्रस्ताव पुण्याला पाठविला. ही बाब ताजी असतानाच लातूर जिल्हा परिषदेत काम करीत असताना अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचा ठपका ठेवत पुणे विभागीय समाजकल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी त्यांचे निलंबन केल्याचा आदेश मंगळवारी काढला. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेने समाजकल्याण विभागाचा पदभार कोणाकडे द्यायचा याबाबत बुधवारी दिवसभर चर्चा, बैठका घेतल्या.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव व महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या नावाची चर्चा होती. सीईओ आव्हाळे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर प्रसाद मिरकले यांचे नाव अंतिम झाले अन् मिरकले यांच्याकडे समाजकल्याण विभागाचा प्रभारी पदभार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीईओ आव्हाळे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.