१८ जुलै पासून सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस धावणार; अडीच वर्षानंतर सोलापूरकरांच्या सेवेत
By Appasaheb.patil | Published: July 13, 2022 07:03 PM2022-07-13T19:03:19+5:302022-07-13T19:03:25+5:30
गाडीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सोलापूरहून पुणे, मुंबईला दररोज जाणारे विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, व्यावसायिक प्रवास करतात. त्यांना ही गाडी सोयीची ठरते.
सोलापूर : सोलापूरकरांच्या हक्काची म्हणून ओळखली जाणारी सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस सोमवार १८ जुलै २०२२ पासून दररोज धावणार आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावरून १.२५ वाजता सुटणारी गाडी ६.०५ वाजता पुण्यात पोहोचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
कोरोनाकाळात बंद करण्यात आलेली इंद्रायणी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी विविध संस्था, रेल्वे संघटना, लोकप्रतिनिधी व प्रवाशांनी संबंधित रेल्वेच्या अधिकार्यांकडे केली होती. मात्र दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाचा मुद्दा समोर करीत इंद्रायणी एक्सप्रेस सुरू न करण्याचे कारण सांगितले जात होते. मात्र प्रवाशांच्या मागणीचा रेटा वाढल्याने रेल्वे प्रशासनाने इंद्रायणी एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोमवार १८ जुलैपासून ही गाडी नियमित धावणार आहे. या गाडीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सोलापूरहून पुणे, मुंबईला दररोज जाणारे विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, व्यावसायिक प्रवास करतात. त्यांना ही गाडी सोयीची ठरते.
अशी धावणार रेल्वे एक्सप्रेस
ही गाडी १८ जुलै २०२२ रोजी पुणे स्थानकावरून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि पुढील स्थानक, दौंड आगमन १०.३३ प्रस्थान १०.३५, जेऊर आगमन ११.३४ प्रस्थान ११.३५, कुर्डुवाडी आगमन १२.०३ प्रस्थान १२.०५, सोलापूर ०१.२५ वाजता पोहोचणार आहे. तर सोलापूर-पुणे एक्सप्रेस सोलापूर स्थानकावरून दुपारी २ वाजता सुटेल आणि पुढील स्थानक कुर्डुवाडी आगमन २.४७ प्रस्थान २.५०, जेऊर आगमन ३.१९ प्रस्थान ०३.२०, दौंड आगमन ०४.३८ प्रस्थान ०४.४०, पुणे ०६.०५ वाजता पुण्यात पोहोचणार आहे.