रोजच्या सव्वादोन तासांच्या ब्लॉकमुळे सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस रेल्वेगाडी महिनाभरासाठी बंद
By Appasaheb.patil | Published: November 30, 2018 11:52 AM2018-11-30T11:52:03+5:302018-11-30T11:59:26+5:30
सोलापूर : रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी भिगवण-वडशिंगे रेल्वे स्टेशनदरम्यान दररोज सव्वादोन तासांचा ब्लॉक घेतला जात आहे़ त्यानिमित्त रेल्वे वाहतूक बंद ...
सोलापूर : रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी भिगवण-वडशिंगे रेल्वे स्टेशनदरम्यान दररोज सव्वादोन तासांचा ब्लॉक घेतला जात आहे़ त्यानिमित्त रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे़ यासाठी इंद्रायणी एक्स्प्रेससह तीन गाड्या ३ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यानच्या काळात ३० दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ याच दरम्यान अनेक प्रवासी गाड्यांमध्ये बदल करण्यात आला असून, अन्य काही गाड्या ठराविक मार्गावरून धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर-पुणे मार्गावर सोलापूर ते दौंडदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामांतर्गत भिगवण-वडशिंगे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी या मार्गावर येत्या ३ डिसेंबरपासून सुमारे ३० दिवसांसाठी दररोज सव्वादोन तास रेल्वे वाहतूक थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी ही दैनिक गाडी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी ही साप्ताहिक (तीन दिवस) गाडी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय पुणे-सोलापूर पॅसेंजर गाडी भिगवणपर्यंत धावणार आहे. तर सोलापूर-पुणे पॅसेंजर गाडीदेखील भिगवणपर्यंतच धावणार आहे. हैदराबाद-पुणे एक्स्प्रेस पुण्याला न जाता कुर्डूवाडीपर्यंत धावणार आहे. तर पुणे-हैदराबाद एक्स्प्रेसही पुण्याहून न सुटता कुर्डूवाडीपासून सुटणार आहे.
पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी ९.३० वाजता सुटून दुपारी १.३० वाजता सोलापूर येथे पोहोचत होती़ त्यानंतर सोलापूर येथून ही रेल्वे गाडी दुपारी २ वाजता सुटून पुण्यात ६.०५ वाजता पोहोचत होती़ दुहेरीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला असून, या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे या रेल्वे गाडीचे आरक्षणही बंद करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
या बंद झालेल्या गाड्यांमुळे दुपारच्या सत्रात पुण्याकडे जाणाºया सोलापुरातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात कसरत करत एसटी बस, खासगी बसने प्रवास करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे़ आरक्षण बंद झाल्याने अनेक जणांनी सकाळच्या सत्रात जाणाºया हुतात्मा एक्स्प्रेसने प्रवास करत पुण्याला जाणे पसंत केले असल्याचेही सांगण्यात येत आहे़ रेल्वे प्रशासनाने यापूर्वी वाशिंबे-जेऊरदरम्यान ट्रॅकच्या कामामुळे १ नोव्हेंबर २०१७ पासून १२५ दिवसांसाठी दररोज १ तास ४५ मिनिटांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला होता.
- गाडी क्रमांक ७१४१३ पुणे-सोलापूर (डेमू) पॅसेंजर पुणे ते सोलापूर निर्धारित वेळेनुसार धावणार आहे़ त्यानंतर गाडी क्रमांक ७१४१४ प्रमाणे सोलापूर ते कुर्डूवाडी आणि कुर्डूवाडी ते सोलापूरपर्यंत धावणार आहे़ यानंतर सोलापूर रेल्वे स्थानकावरून गाडी क्रमांक ७१४१६ ही गाडी पुण्यापर्यंत धावणार आहे़ कुर्डूवाडी ते पुणेदरम्यान आणि गाडी क्रमांक ७१४१५ पुणे ते कुर्डूवाडीदरम्यान धावणार नाही.
- - गाडी क्रमांक ७१४१६ सोलापूर ते पुणे (डेमू) पॅसेंजर सोलापूर ते पुणे धावणार आहे़ त्यानंतर गाडी क्रमांक ७१४१५ पुणे ते भिगवणपर्यंत धावेल़ ही गाडी भिगवण ते पुणे गाडी क्रमांक ७१४१४ सोलापूर स्थानकापर्यंत आपल्या निर्धारित वेळेत धावणार आहे़ गाडी क्रमांक ७१४१५ भिगवण ते कुर्डूवाडीदरम्यान व ७१४१४ कुर्डूवाडी ते भिगवणदरम्यान ही गाडी धावणार नाही़
- - गाडी क्रमांक १६५०१ अहमदाबाद-यशवंतपूर एक्स्प्रेस गाडी आठवड्यातून एक वेळा कुर्डूवाडी-दौंड सेक्शनमध्ये आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २५ मिनिटे उशिराने धावणार आहे़
- - गाडी क्रमांक २२८८१ पुणे-भुवनेश्वर एक्स्पे्रस ही गाडी आठवड्यातून एक वेळा धावणारी कुर्डूवाडी-दौंड सेक्शनमध्ये आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २५ मिनिटे उशिराने धावणार आहे़
- - गाडी क्रमांक २२६०२ साईनगर (शिर्डी)-चेन्नई एक्स्प्रेस ही गाडी आठवड्यातून एक वेळा वरील कालावधीत कुर्डूवाडी-दौंड सेक्शनमध्ये आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २५ मिनिटे उशिराने धावणार आहे़
- - गाडी क्रमांक ११४०६ अमरावती-पुणे एक्स्प्रेस गाडी आठवड्यातून दोन वेळा वरील कालावधीत कुर्डूवाडी-दौंड सेक्शनमध्ये आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहे़