सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद पाडला; मोहोळजवळ वाहनांच्या अडीच किलोमीटरपर्यंत रांगा
By Appasaheb.patil | Published: October 31, 2023 11:57 AM2023-10-31T11:57:07+5:302023-10-31T11:58:22+5:30
पोलिस घटनास्थळावर येताच आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सोलापूर : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन तीव्र होत आहे. सोलापूर-पुणे हायवे मंगळवारी बंद पाडला. मोहोळ शहरातील मराठा समाज बांधव हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अचानक आंदोलन केल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. काही तास वाहतूक खोळंबली होती. पोलिस घटनास्थळावर येताच आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, एक मराठा...लाख मराठा...आरक्षण आमच्या हक्काचं..नाही कोणाच्या बापाचं..अशा एकापेक्षा एक घोषणांनी अक्कलकोट रोड दणाणून गेला होता. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेत रस्त्यावरील जळते टायर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अर्धा तासभर वाहतूक खोळंबली होती, वाहनांच्या अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, मंगळवारी सकाळपासून आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आमरण उपोषण, रास्ता रोको, टायर जाळणे व गावबंदीचा ज्वर गावोगावी पसरला आहे. गावागावांत रात्रंदिवस मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळी आंदोलने सुरू झाली आहेत. मराठा समाज बांधव आक्रमक आंदोलन करीत राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. त्याबाबतचा फलक गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर पोलिसांनी बंदाेबस्त वाढविला आहे.
दरम्यान, सोलापूर आगारातून बाहेरील जिल्ह्यात जात असलेल्या एसटी गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मंगळवारी सकाळी मराठा समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय बंद पाडले. याशिवाय विविध ठिकाणी आंदोलनाचे स्वरूप तीव्र होत आहे.