स्वच्छता सर्वेक्षणात सोलापूर रेल्वे स्थानकाचा प्रथम क्रमांक
By Appasaheb.patil | Published: October 4, 2019 07:59 PM2019-10-04T19:59:37+5:302019-10-04T20:01:21+5:30
मध्य रेल्वे : सोलापूर रेल्वेस्थानक भारतात १९ व्या स्थानावर
सोलापूर : भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात सोलापूर स्थानक स्वच्छतेच्या क्रमवारीत भारतामध्ये १९ व्या स्थानावर तर मध्य रेल्वे विभागात प्रथम क्रमांकावर आले आहे. स्वच्छतेबाबत थर्ड पार्टी आॅडिट सर्व्हेचा निकाल आज रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्याची माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
रेल्वे मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेबाबत थर्ड पार्टी आॅडिट सर्व्हे करण्यात आला होता़ या सर्वेक्षणात प्रक्रिया मूल्यमापन, थेट निरीक्षण आणि नागरिकांचा अभिप्राय असे तीन घटक समाविष्ट करण्यात आले होते. प्रत्येक घटकाला ३३.३३ टक्के गुण देण्यात आले होते. प्रक्रिया मूल्यमापनामध्ये स्टेशनवरील स्वच्छतेच्या कृतीची यंत्रणा तपासली गेली तर थेट निरीक्षणामध्ये स्टेशनच्या स्वच्छतेबद्दल क्यूसीआय आॅडिट टीमने प्रत्यक्ष निरीक्षण केले.
नागरिकांच्या अभिप्राय ज्यामध्ये रहिवाशांना स्टेशनचा अनुभव कसा आला यासंबंधी त्यांचे मत घेतले गेले. मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर स्थानकाचा पूर्ण कायापालट झाला आहे. सर्वस्तरातून स्थानकाचे कौतुक होत आहे. वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांच्या नेतृत्वाखाली वाणिज्य विभागाकडून स्थानकांच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे. मंडल वाणिज्य प्रबंधक श्याम कुलकर्णी आणि सहायक वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांचे सोलापूर विभागातील स्थानकाच्या स्वच्छता सुधारणामध्ये विशेष योगदान राहिले आहे. प्रवाशांनीसुद्धा स्थानकाची स्वच्छता कायम राहावी यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.