Solapur: सहा ठिकाणच्या वाळू उपशासाठी २७ निविदा प्राप्त, गुरसाळेसाठी फक्त एक निविदा आल्याने पुन्हा निविदा
By संताजी शिंदे | Published: June 21, 2023 05:25 PM2023-06-21T17:25:44+5:302023-06-21T17:25:54+5:30
Solapur: शासनाच्या वाळू धोरणानुसार भीमा नदी च्या पात्रातील सहा ठिकाणच्या वाळू उपशासाठी २७ निविदा प्राप्त झाल्या आहेत. मात्र पंढरपुरातील गुरसाळे येथील उपशासाठी फक्त एकच निविदा आल्याने त्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे.
- संताजी शिंदे
सोलापूर - शासनाच्या वाळू धोरणानुसार भीमा नदी च्या पात्रातील सहा ठिकाणच्या वाळू उपशासाठी २७ निविदा प्राप्त झाल्या आहेत. मात्र पंढरपुरातील गुरसाळे येथील उपशासाठी फक्त एकच निविदा आल्याने त्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे.
१९ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार राज्यातील पूर परिस्थितीचा धोका कमी करण्यासाठी गाळमिश्रित वाळू काढण्यासाठी भीमा नदीच्या पात्रातील सहा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. निश्चित केलेल्या वाळू उपशासाठी जिल्हा प्रशासनाकडून ऑनलाइन निविदा मागवण्यात आल्या होत्या. ९ जून २०२३ रोजी उघडण्यात आल्या तेव्हां चळे (ता.पंढरपूर), उचेठाण, जांभूड (ता. मंगळवेढा) या ठिकाणच्या वाळू उपशासाठी फक्त प्रत्येकी एक निविदा आली होती. जिल्हा प्रशासनाने निविदा मागवण्यासाठी १६ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र त्या दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने निविदा पाहता आल्या नाहीत.
प्रशासनाने पुन्हा १९ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. सोमवारी सायंकाळी ऑनलाइन निविदा पाहिल्यानंतर त्यात वाढ झालेले दिसून आले. मौजे. चळे (ता. पंढरपूर) साठी ०६, मौजे उचेठाण (मंगळवेढा)-०७, मौजे. जांभूड (ता.माळशिरस)-०७, मौजे. उंबरे वेळापूर (ता.माळशिरस)-०३, मौजे. वाफेगाव (ता.माळशिरस)-०३ व मौजे. गुरसाळे (ता.पंढरपूर)-०१ अशा निविदा प्राप्त झाल्या आहेत. गुरसाळेसाठी एकच निविदा आल्याने तेथील उपशासाठी पुन्हा २६ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने ३ जून रोजी वाळू उपशाबाबत निविदा प्रसिद्ध केली हाेती. सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मुदत वाढवून दिल्यानंतर निविदांच्या संख्येत वाढ झाली.
शासन निर्णयानुसार मागवण्यात आलेल्या वाळू उपशासाठी निविदा प्राप्त झाल्या आहेत. गुरसाळे येथे एकच निविदा आल्याने ते देता येत नाही. प्राप्त झालेल्या अन्य निविदाधारकांची तांत्रिक तपासणी केल्यानंतर पुढील दोन दिवसात पुढील कारवाई केली जाईल.
- दिव्या वर्मा, जिल्हा खनिकर्म अधिकारी.
कोणत्या ठिकाणी किती वाळू उपसा?
गावे ब्रास
१) चळे (पंढरपूर)- १४ हजार १३४
२) उचेठाण (मंगळवेढा) ८ हजार ४००
३) जांभूड (माळशिरस) ८ हजार
४) उंबरे वेळापूर (माळशिरस) पाच हजार
५) वाफेगाव (माळशिरस) पाच हजार ५००
६) गुरसाळे (पंढरपूर) ९ हजार