सोलापूरचा दहावीचा निकाल ८९.३७ टक्के
By admin | Published: June 18, 2014 12:47 AM2014-06-18T00:47:34+5:302014-06-18T00:47:34+5:30
सेंट जोसेफची आर्शिया चौधरी जिल्ह्यात पहिली तर सांगोल्याचा पंकज सुतार दुसरा
सोलापूरचा दहावीचा निकाल ८९.३७ टक्के
सेंट जोसेफची आर्शिया चौधरी जिल्ह्यात पहिली तर सांगोल्याचा पंकज सुतार दुसरा
सोलापूर : पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा सोलापूर जिल्ह्याचा निकाल ८९.३७ टक्के इतका लागला असून, या परीक्षेत गेल्या वर्षीप्रमाणेच मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेत सेंट जोसेफ प्रशालेची आर्शिया युन्नूस चौधरी हिने ९७.८० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात आणि मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर सांगोला येथील सांगोला विद्यामंदिरचा पंकज दिनकर सुतार यांने ९७.६० टक्के गुण मिळवून दुसरा तसेच बी. एफ. दमाणी हायस्कूलचा श्रेयस सारडा व सांगोला विद्यामंदिरचा प्रथमेश बाबर यांनी अनुक्रमे ९७.४० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातून ९११ शाळांमधून ५९,४१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ५९,१४३ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यापैकी ५२,८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे शेकडा प्रमाण ८९.३७ टक्के इतके आहे.
सोलापूर जिल्ह्यातून या परीक्षेसाठी ३३,७३६ मुलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३३,५७२ मुले प्रत्यक्ष परीक्षेला बसली. त्यातील २९,३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णाचे शेकडा प्रमाण ८७.३१ टक्के इतके आहे. तर २५,६७२ मुलींनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,५७१ मुली प्रत्यक्ष परीक्षेला बसल्या. त्यातील २३,५४३ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्णाचे हे शेकडा प्रमाण ९२.०७ टक्के इतके आहे.
जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्रावीण्यमध्ये ११,१८४, प्रथम श्रेणीत १८,६४४, द्वितीय श्रेणीत १८,०९१ तर ४९३५ विद्यार्थी पास श्रेणीत आहेत.
जुन्या अभ्यासक्रमानुसार ६७२८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ६६८९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यपैकी ७५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णाचे शेकडा प्रमाण ११.४७ टक्के इतके आहे.