सोलापुरातील रस्ते नावालाच मोठे, वाहतुकीसाठी मात्र छोटे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:15 PM2018-11-29T13:15:02+5:302018-11-29T14:02:18+5:30

महापालिका हतबल: फूटपाथ, मोकळे केलेल्या रस्त्यावर अतिक्रमण ‘जैसे थे’

Solapur roads are big, only small for transport! | सोलापुरातील रस्ते नावालाच मोठे, वाहतुकीसाठी मात्र छोटे !

सोलापुरातील रस्ते नावालाच मोठे, वाहतुकीसाठी मात्र छोटे !

Next
ठळक मुद्देपंचकट्टा ते विजापूर वेस हा मार्ग स्मार्ट सिटीतून नव्याने करण्यात येत आहे महापालिकेने मोठे केलेले रस्ते अतिक्रमणामुळे व्यापून गेल्याचे दिसून आलेदुकानासमोर माल चढउतार करणारी वाहने रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीला अडथळा

राजकुमार सारोळे 

सोलापूर: शहरात कोणत्याही रस्त्यावरून जा, गर्दीमुळे ट्रॅफिक जाम ही नित्याची बाब झाली आहे. वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे जो तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि रस्त्यावरील अतिक्रमणाच्या विळख्यात वाट सापडत नाही. वर्दळ पाहून स्मार्ट सिटीतील रस्ते मोठे करण्यात आले. पण बाजूच्या लोकांनी पाय पसरल्याने वाहतुकीला याचा फायदा होतच नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळले आहे. 

नगरोत्थान योजनेतून सात रस्ता ते बलिदान चौकापर्यंतचा रस्ता रुंदीकरणासह चकचकित करण्यात आला. या रस्त्याची पाहणी केल्यावर झेडपीजवळ फूटपाथवरचे अतिक्रमण जैसे थे दिसले. येथे भेटलेले राजकुमार वाघमारे म्हणाले की प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून चालढकल केली जात आहे. पुढे गेल्यावर ट्रॅफिक जॅम दिसले. याबाबत विचारले असता दिलीप शिंदे म्हणाले की स्मार्ट रोडचे काम सुरू असल्याने रंगभवन चौकाकडील वाहतूक पूनम गेट, सिद्धेश्वर प्रशालेमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, विजापूर वेस आणि पंचकट्टामार्गे सुरू आहे. या तिन्ही मार्गांवरील वाहतूक पूनम गेटजवळ एकत्र येत असल्याने या ठिकाणी वारंवार ट्रॅफिक जाम होत आहे.

पंचकट्टा व महापालिकेकडील रस्त्यांची पाहणी केली असता, महापालिकेने मोठे केलेले रस्ते अतिक्रमणामुळे व्यापून गेल्याचे दिसून आले. पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट यादरम्यान दुकानदारांचे साहित्य रस्त्यावर आले आहे. अशातच दुकानासमोर माल चढउतार करणारी वाहने रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. 

पंचकट्टा ते विजापूर वेस हा मार्ग स्मार्ट सिटीतून नव्याने करण्यात येत आहे. यासाठी दोन्ही बाजूंचे दुकानदारांना जागा सोडावी लागली आहे. पण सध्या दुकानातील साहित्य रस्त्यावर येत आहे. त्यामुळे भविष्यात रस्ता झाल्यावर तरी या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार का, असा सवाल सुनील धरणे यांनी उपस्थित केला. मुल्लाबाबा टेकडीवरील दुकानांचे साहित्य रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याचे चित्र आहे. यामुळे शाळकरी मुलांना वाहनांच्या तावडीतून जीव वाचवित जावे लागते. बाजूचा परिसर स्मार्ट होत असताना रस्त्यावरील स्थिती मात्र सुधारताना दिसत नाही. हीच परिस्थिती ७0 फूट रोडची आहे. या रस्त्यावरील मार्केट हटलेले नाही. विक्रेत्यांना नवीन मार्केट उपलब्ध करून दिले तरी हा रस्ता मोकळा झालेला नाही. होटगीरोडवर विमानतळापर्यंत ही अवस्था आहे. शिवशाहीसमोर अवजड वाहने रस्त्यावर थांबत असल्याने लोकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. 

ओऽऽ पुढे चला...
- बाजारपेठेतील रस्ते मोठे आहेत. पण दुकानदारांना ते छोटे पडतात. खरेदीस आलेल्या वाहनधारकांना दुकानासमोर थांबता येत नाही. दुकानाशेजारी वाहन घेतले की, दुकानदार ओरडतो ओ पुढे चला. यावरून बºयाचवेळा वादावादीचे प्रकार घडतात. मालवाहू वाहने मात्र रस्त्यावर आडवीतिडवी थांबलेली असतात. अशा वाहनांसाठी पार्किंगचा पट्टा मारला जात नाही. शहरातील ही अवस्था पाहून महापालिकेने शाळकरी मुलांसाठी ‘रस्ता कुणाच्या बापाचा’ या विषयावर स्पर्धा घेतली आहे. ‘सुरक्षित रहदारी’ या विषयावर लोकांमध्ये जागृती व्हावी, हा यामागचा उद्देश असल्याचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे यांनी सांगितले. 

‘अतिक्रमण हटाव’चे सातत्य हवे
- मुंबई, पुणे शहराप्रमाणे शहरात अतिक्रमण हटावच्या पथकाचे सातत्य हवे, असे मत इब्राहिम मुल्ला यांनी व्यक्त केले. त्यामुळे लोकांमध्ये जागरुकता निर्माण होईल. विक्रेते, व्यापारी सजग होऊन रस्ते मोकळे ठेवतील. छोट्या व्यावसायिकांच्या पोटापाण्याचा विचार केला तरी सुरक्षित वाहतूक हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शहरातील पदपाथ मोकळे करण्याची मोहीम घेतली. ही बाब अत्यंत चांगली आहे. या मोहिमेनंतरही पुन्हा अतिक्रमण करणाºयांवर कडक कारवाई झाली पाहिजे. 

Web Title: Solapur roads are big, only small for transport!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.