‘४५ डिग्री’तही सोलापूरकर धावले तोºयात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 10:58 AM2019-05-22T10:58:39+5:302019-05-22T10:59:45+5:30
१४ वर्षांनंतर पाºयाचा उच्चांक; दिवसभर उन्हाच्या तडाख्यानं सोलापूरकर हैराण तरीही दिनचर्येत फरक नाहीच..
सोलापूर: गेल्या महिन्यापासून एकेक टप्पा सर करीत तापमानाच्या पाºयाची १४ वर्षांनंतर ४५ अंश सेल्सिअसची नोंद येथील हवामान खात्याच्या तापमापकावर झाली. एवढ्या उच्चांकी ४५ डिग्रीतही सोलापूरकर हैराण झाले तरी उन्हापासून संरक्षणासाठी स्कॉर्फ, टोपी, गॉगलचा वापर करीत आपल्या दिनचर्येत फरक पडू दिला नाही.
सोलापुरात यापूर्वी २० मे २००५ रोजी असा सर्वाधिक उष्ण दिवस सोलापूरकरांनी अनुभवला होता. या दिवशी ४५.१ अंश सेल्सिअस अशी नोंद होती. उन्हाच्या तीव्रतेने चार दिवसांपासून लाही लाही होणाºया सोलापूरकर समर्थपणे तोंड देत आहेत.
गेल्या २८ वर्षांत सोलापूरकरांना मार्च महिन्याच्या प्रारंभापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरू होतात. १९९१ पासून सातत्याने येथे तापमानाचा पारा ४२ अंशाच्या पुढेच राहिलेला आहे. पर्यावरण क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे ही स्थिती उद्भवत असल्याचे सांगण्यात येत आहे. विकासाचे पाऊल पुढे टाकताना झालेली वृक्षतोड आणि त्यानंतर निसर्ग संवर्धनासाठी झालेले तोकडे प्रयत्न यामुळे निर्माण होणाºया स्थितीला रोखून पर्यावरणाचा समतोल राखायला हवा असे मत व्यक्त होत आहे.
सोमवारी दिवसभर उन्हाची तीव्रता कायम असल्याने पारा ४४.३ अंशावर पोहोचला असताना आज दुसºया दिवशीही त्याहून अधिक तापमानामुळे घराबाहेर आणि घर, कार्यालयामध्ये असणाºयांनाही पंखे लावूनही उष्म्याची धग सहन करावी लागली. ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा खंडित झालेल्या गावांमध्ये घामाच्या धारांनी चिंब भिजावे लागले. लहान मुलं आणि वृद्धांना, दमा, अस्थमा आजारांनी त्रस्त रुग्णांना याचा अधिक त्रास सहन करावा लागला.
दररोजचा सकाळचा दिवस उजाडला की, ८ वाजल्यापासूनच ऊन वाढते आणि घामाच्या धारा वाहायला सुरू होताहेत. दुचाकीवरून दहा मिनिटे जरी उन्हातून निघाले तरी डोळ्याला जाणवणारा उष्णतेचा दाह, तापणारी कानशिलं यामुळे नोकरी व अन्य कामासाठी जाणाºया मंडळींनी उन्हाच्या या चटक्यांपासून वाचवण्यासाठी टोप्या, हेल्मेट, छत्रीचा वापर सुरू केला आहे. मुलींनी स्कार्फचा वापर करणे सुरू केले आहे. उन्हाचा हा फटका प्रामुख्याने लहान मुले, वृद्धांना अधिक बसू लागला आहे. त्यातच मधुमेही, दम्याच्या विकाराने त्रस्त रुग्णांना ही झळ अधिक बसू लागली आहे. उन्हामुळे निर्माण होणाºया आजारांपासून बचावासाठी शुभ्र वस्त्रे परिधान करावीत. उन्हातून आल्या आल्या पाणी पिऊ नये. चेहºयावर दिवसातून चार वेळा तरी पाणी शिंपडावे, अशा टिप्स दिल्या आहेत.
२८ वर्षांत सोलापूरचे टेम्परेचर
- गेल्या अठ्ठावीस वर्षांत आतापर्यंत ४५.१ अंश सेल्सिअस हे उच्चांकी तापमान २० मे २००५ रोजी नोंदले आहे. १९९१ पासून २०१८ पर्यंत पारा ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत राहिलेला आहे. यंदा याहून अधिक तापमान नोंदले जाऊ शकते, असे जाणकार म्हणताहेत.
आज प्रस्थापित होऊ शकतो नवा उच्चांक
- अलीकडच्या काळात १४ वर्षांपूर्वी २० मे २००५ रोजी ४५.१ अं. से. उच्चांकी तापमान सोलापुरात नोंदलेले आहे. तो उच्चांक मोडून नव्याने उच्चांक प्रस्थापित होण्यासाठी ०.१ अं. से. कमी आहे. बुधवारी कदाचित तो क्रॉस करू शकतो, अशी शक्यताही हवामान खात्याच्या वैज्ञानिकांसह जाणकारांनी व्यक्त केली आहे. लोकमतने सातत्याने दैनंदिन तापमानावर बारीक नजर ठेवून अभ्यासकांशी संपर्क ठेवून यंदा तापमान ४५ अं.से. क्रॉस करणार याची मांडणी केली होती.
गेल्या २८ वर्षांतील तापमानावर नजर टाकू यात..
- १९९१ (४३.७ अंश सेल्सिअस), १९९२ (४३.१), १९९३ (४४.५), १९९४ (४३.३), १९९५ (४४.८), १९९६ (४३.९), १९९७ (४२.३), १९९८ (४४.७), १९९९ (४४.८), २००० (४३.५),२००१ (४४.५), २००२ (४४.१), २००३ (४४.५), २००४ (४४.०), २००५ (४५.१), २००६ (४३.२), २००७ (४३.९), २००८ (४३.८), २००९ (४४.०), २०१० (४४.७), २०११ (४२.७), २०१२ (४३.२), २०१३ (४३.६), २०१४ (४३.५), २०१५ (४३.८), २०१६ (४४.९), २०१७ (४३.८), २०१८ (४३.७) आजअखेर २०१९ (४५.०)
दुपारी तीनपर्यंत टळटळीत ऊन.. मग शिराळ ऊन पाठशिवणी.. अन् रात्री पावसाच्या सरी
- मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच तडाख्याच्या उन्हानं आपलं रौद्र रूप दाखवायला सुरू केली. ११ नंतर दुपारी तीन वाजेपर्यंत उष्म्याच्या झळांची तीव्रता अधिकच वाढली. रस्त्यावरून धावणाºया दुचाकीस्वारांपासून घरबसल्या मंडळींना उकाड्याने घामांच्या धारांनी चिंब व्हावे लागले. यानंतर मात्र ऊन आणि शिराळ असा पाठशिवणीचा खेळ अधूनमधून सुरू होता. यामुळे ऊन कमी वाटत असलातरी उष्मा कायम होता. चारच्या सुमारास काही ठिकाणी चार थेंब पडले. सायंकाळी साडेपाचनंतर आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले. वारा सुटलेला, मात्र तोही कानशिलांना गरम करीत असल्याचा अनुभव सोलापूरकरांना आला. रात्री साडेआठनंतर १० मिनिटे पावसाच्या सरी पडल्या. यामुळे काही काळ थंडावा अनुभवला. त्यानंतर तापलेल्या जमिनीतून आणि वातावरणातील उष्म्याने शहरवासीयांना हैराण केले.