सोलापूर ग्रामीण पोलीस ठाणे आवारात ओपन जीम, चिल्ड्रन पार्क, ऑक्सिपार्क अन् व्हॉलिबॉल ग्राउंड
By Appasaheb.patil | Published: December 6, 2021 03:05 PM2021-12-06T15:05:16+5:302021-12-06T15:05:51+5:30
सोलापूर ग्रामीण पोलीस दल; २५ पोलीस ठाणे बनली सुंदर, सुसज्ज अन् स्मार्ट
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : पोलीस ठाणे म्हटलं की जप्त, कारवाई व अपघातातील भंगार गाड्या..गळक्या इमारती..तुटलेल्या खुर्च्या..सतत खणखणणारा तो जुना टेलिफोन..ठाण्याच्या आवारात झाडे, झुडपं..खराब रस्ता..हा सारा अनुभव आता विरोधाभास ठरतोय आहे. ग्रामीण भागातील पोलीस ठाणी आता कबाडी खाना नव्हे तर स्मार्ट, सुसज्ज अन् सुंदर बनली आहेत. आता ठाणे आवारात ओपन जीम, चिल्ड्रन पार्क, ऑक्सिपार्क अन् व्हॉलिबॉलचे ग्राउंड पहावयास मिळत आहे. की किमया साधली आहे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पेतून.
सोलापूर ग्रामीण पोलीस ठाणेतंर्गत एकूण २५ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. मागील कित्येक वर्षापासून काही पोलीस ठाण्यांच्या इमारती जीर्ण व मोडकळीस आल्या होत्या. शिवाय अनेक पोलीस ठाण्याच्या दुरवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तो आता दूर झाला असून जिल्ह्यातील २५ पैकी १६ पोलीस ठाणे सुसज्ज, सुंदर अन् स्मार्ट बनविण्यात आली आहेत.
डीपीडीसी, सीएसआर अन् लोकसहभागातून निधी उभारला
जिल्ह्यातील २५ पोलीस ठाणे स्मार्ट बनविण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेच्या अंतर्गत जिल्हा नियोजन विकास यंत्रणा, सीएसआर फंड व लोकसहभागातून निधी उभा करून ठाण्याच्या इमारती दुरुस्त, रंगकाम व इतर सेवासुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याकामी बांधकाम विभागाची मदतही मिळाल्याचे सांगण्यात आले.
१६ टन कागदपत्रे नाश...
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये वर्षानुवर्ष विविध प्रकारच्या केसेस, फाईली, रिपोर्ट अशा एक ना अनेक प्रकारच्या कागदपत्रांचा ढिगारा साचला होता. ठाण्यांमधील कपाट गच्च भरली होती. काही कागदपत्रांना वाळवी लागली होती. या कागदपत्रांचा अभ्यास न लागणारे १६ टन कागदपत्रे नाश केली.
वळसंग, कामती, अक्कलकोट, पंढरपूरचे ठाणे टॉप...
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वळसंग, कामती, अक्कलकोट, पंढरपूर शहर, ग्रामीण, सोलापूर तालुका, बार्शी, मोहोळ, माळशिरस, मंगळवेढा यासह अन्य पोलीस ठाण्यांचा कायापालट झाला आहे. उर्वरित पोलीस ठाण्यांचे काम सुरू आहे. वळसंग पोलीस ठाणे आवारात ओपन जीम, चिल्ड्रन पार्क, वॉकिंग ट्रॅक, ऑक्सीपार्क, मियावॉकी फॉरेस्ट, प्ले गार्डन, वनभोजन कट्टा आदी विविध प्रकारच्या सेवासुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कामती पोलीस ठाणे आवारात व्हॉलिबॉल ग्राउंड, ओपन जीम, चिल्ड्रन पार्कची तर मंद्रुप पोलीस ठाण्यात सेल्फी पाॅईंटची उभारणी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील २५ पैकी १६ ते १७ पोलीस ठाणे स्वच्छ, सुसज्ज, सुंदर अन् स्मार्ट बनली आहेत. डीपीडीसी, सीएसआर व लोकसहभागातून यासाठी निधी उभारला. पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांसाठी हव्या असणाऱ्या सेवासुविधा आता पोलीस ठाण्यात मिळू लागल्या आहेत.
- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण