Solapur: शॉर्ट सर्कीट होऊन सॉ मिल पेटली, बार्शीत १२ लाखांचे फर्निचर भस्मसात
By काशिनाथ वाघमारे | Published: June 3, 2023 10:56 PM2023-06-03T22:56:00+5:302023-06-03T22:56:11+5:30
Solapur: बार्शी- तुळजापूर रस्त्यावर शॉर्ट सर्कीट होऊन लाकडी फर्निचर तयार करणा-या एका सॉ मिलला आग लागली. या आगीत लाकडी फर्निचर मशिनरी व इतर साहित्य जळून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
- काशिनाथ वाघमारे
सोलापूर - बार्शी- तुळजापूर रस्त्यावर शॉर्ट सर्कीट होऊन लाकडी फर्निचर तयार करणा-या एका सॉ मिलला आग लागली. या आगीत लाकडी फर्निचर मशिनरी व इतर साहित्य जळून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास बार्शी येथे तुळजापूर रोडवर कदमवस्ती जवळ घडली. याबाबत तालुका पोलिसात सम्राट प्रतापसिंह ठाकूर (रा.बार्शी) यांनी तालुका पोलीसात शनिवारी रात्री उशिरा फिर्याद दिली आणि त्याची नोंद झाली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी सम्राट ठाकूर आणि त्याचा भाऊ अमृत हे दोघे फर्निचर व लाकडाचा व्यवसाय करतात. त्यांच्या सॉ मिल जवळूनच महावितरणचे ४४० व्होल्टेजची थ्री फेज जुने कनेक्शन गेलेले आहे. रात्री अचानक वादळी वारे झाले आणि प्रवाहीत वायर तुटली. मिलच्या बाहेर असलेल्या लाकडी स्क्रॅपवर पडली. यावेळी लाकडाने व भुस्याने पेट घेतला. पाहता-पाहता आग भडकत गेली. मिलमधील साहित्य पेटत गेले. या आगीने रौद्ररुप धारण केले आणि लहान १४ मशिनरी जळून खाक झाल्या. तसेच तर तयार केलेल्या ५० चौकटी व २५ खिडक्या व मोठया दोन मशिनरी आणि कापून ठेवलेली लाकडं तसेच मशीनरी जळाल्याने जवळपास १२ लाख रुपयांचे नुकसान झाले.