सोलापूर : माळशिरस तालुक्यात १४१ पैकी ४१ गावात टंचाई सदृश्य स्थिती
By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 10, 2024 04:12 PM2024-01-10T16:12:59+5:302024-01-10T16:13:17+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक
सोलापूर : माळशिरस तालुक्यातील ११४ गावांपैकी ४१ गावात पाणी टंचाई परिस्थिती असून ७८ पाणी स्त्रोताच्या ठिकाणी पाणी उपसा बंदी लागू केल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात माळशिरस तालुक्यातील टंचाई परिस्थितीची बैठक झाली. यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, माळशिरस उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, तहसीलदार सुरेश शेजवळ, गट विकास अधिकारी विनायक गुळवे आदी उपस्थित होते.
तालुकास्तरीय यंत्रणांनी टंचाई आराखड्याचे कार्यालयात बसून नियोजन न करता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी करावी. टंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाई स्त्रोताच्या ठिकाणच्या दीड किलोमीटरच्या परिसरात पाणी उपसा बंदी जाहीर केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.