Solapur: आत्मनिर्भर निधी; सोलापूर शहरातील साडेआठ हजार पथविक्रेत्यांना मिळाले ११ कोटींचे कर्ज
By Appasaheb.patil | Published: March 1, 2023 09:29 PM2023-03-01T21:29:54+5:302023-03-01T21:30:16+5:30
Solapur: प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी सोलापूर महानगरपालिका एनयूएलएम विभाग शहर अभियान कक्षाद्वारे युद्धपातळीवर सुरू असून शहरातील एकूण ८७४५ पथविक्रेत्यांनी १० कोटी ३० लाख रुपयाचे कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँकामार्फत करण्यात आले.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी सोलापूर महानगरपालिका एनयूएलएम विभाग शहर अभियान कक्षाद्वारे युद्धपातळीवर सुरू असून शहरातील एकूण ८७४५ पथविक्रेत्यांनी १० कोटी ३० लाख रुपयाचे कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँकामार्फत करण्यात आले.
या योजनेसाठी २० हजार पथ विक्रेत्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले होते. १० हजार रुपये नियमित परतफेड करणाऱ्या १४०० लाभार्थ्यांना २० हजार रुपये कर्जाचा तर २० हजार रूपये नियमित परतफेड करणाऱ्या ५० लाभार्थ्यांना ५० हजार रुपयाचे कर्ज प्राप्त झाले आहे, तसेच या सर्व लाभार्थ्यांना ‘मै भी डिजिटल’ अभियान अंतर्गत ऑनलाइन व्यवहार करण्याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण प्राप्त ६ हजार पथविक्रेते डिजिटल व्यवहार करून कॅशबॅकचा ही नियमित लाभ घेत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामारीने त्रस्त घटकामध्ये रोजी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या पथविक्रेत्यांसाठी सदर योजना ही आर्थिक संजीवनी देण्याचे कार्य करीत आहे, अत्यंत कमी कालावधीमध्ये शिफारस पत्र देऊन ऑनलाइन अर्जाचे जलदगतीने उद्दिष्ट पूर्ण करून कर्जाचा लाभ मिळवून देण्यामध्ये आयुक्त, उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी एनयूएलएम विभागातील शहर अभियान व्यवस्थापक, समुदाय संघटक, अग्रणी बँक व्यवस्थापक, सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्तिक अथक प्रयत्नामुळे सोलापूर महानगरपालिका ही १० लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेमध्ये सोलापूर शहर महानगरपालिका हे प्रथम क्रमांकावर आले आहे.