Solapur Varun Sardesai : "... म्हणून नवे मित्र जोडावे लागले, आता परिस्थिती काहीही असो येणारा काळ शिवसेनेचाच असेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 08:07 PM2022-03-28T20:07:51+5:302022-03-28T20:08:11+5:30
Solapur Varun Sardesai : युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांचं वक्तव्य. जे ३० वर्ष शिवसेनेसोबत होते त्यांनी काय वेगळं केलं : वरुण सरदेसाई
Solapur Varun Sardesai : "तानाजी सावंत यांनी फार मोठी यादी वाचून दाखवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशाप्रकारे शिवसेनेवर अन्याय करते किंवा प्रयत्न करते, याची यादी वाचली. मी आज युवासेनेचा पदाधिकारी, सचिव म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. मी शिवसेनेचा नेता, पदाधिकारी नाही. तरी सामान्य शिवसैनिकांना जो त्रास व्यक्त केलाय तो युवासैनिक म्हणून जी काही तुम्ही सांगितलं ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवेन," असं युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी सांगितलं. सोलापूरातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
"आपले दोन नवे मित्रपक्ष आहेत त्यांच्याकडून हवी तशी साथ मिळत नाही, असं तुम्ही सांगत होता. परंतु हे दोन नवे मित्रपक्ष ३० वर्षांचे विरोधक आहेत. जे ३० वर्ष सोबत होते त्यांनी काय वेगळं केलं. जे शिवसेनेच्या सोबत होते ते शिवसेनेच्या अंगठ्याला पकडून खांद्यावर बसले. खांद्यावर बसून डोक्यावर बसले आणि त्यानंतर आपल्याला गाढायचा प्रयत्न केला अशा मित्रांनी आपल्यासोबत काय केलं. अशा मित्रांना घरी बसवण्यासाठी नवे मित्र आपल्याला जोडावे लागले. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले आहेत. आता परिस्थितीत काहीही असो पण येणारा काळ फक्त शिवसेनेचाच असेल," असंही सरदेसाई म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात शिवसेनेला यश मिळालं. निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आश्वासन पाळण्यास सांगितलं. तर भाजपनं असं काही ठरलं नसल्याचं म्हटलं. म्हणून आपल्याला १०५ लोकांना घरी बसवावं लागलं आणि नवे मित्र जोडावे लागल्याचं ते म्हणाले.