सोलापूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेचं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:38 AM2022-02-28T11:38:55+5:302022-02-28T11:40:11+5:30
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेने केलं आंदोलन.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत सोलापुरात शिवसेनेच्यावतीने सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात सोलापुरात शिवसेनेच्यावतीने सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून निषेध करण्यात आला. राज्यपालांनी आजच रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसंच दररोज राज्यपालांच्या कार्यालयात फेऱ्या मारणारे भाजप नेते माफी मागणार काय असा सवालही यावेळी करण्यात आला.
सुप्रिया सुळेंचीही प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या एका निकालाचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार, तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार...
— Supriya Sule (@supriya_sule) February 28, 2022
'तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. pic.twitter.com/nA6cJKo9Rl
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे शरद पवार यांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितलं आहे. जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं… रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी… त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती, त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविले अशी लेखणीची कमालकृत्यं केली, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. याशिवाय, शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.