चार राज्यांना सेवा देणारं सोलापूर व्हायला हवं मेडिकल हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:06 PM2019-07-01T12:06:25+5:302019-07-01T12:09:46+5:30
Doctor's Day : नऊ हजार बेड्सच्या ३५० हॉस्पिटल्समधून यशस्वी उपचार
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : महानगरांच्या तुलनेत किफायतशीर आणि आपुलकीची, अजोड वैद्यकीय सेवा मिळत असल्यामुळे अलीकडे महाराष्टÑाच्या विविध शहरांसह शेजारील कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील रुग्ण सोलापुरात उपचारासाठी येत असून, हे शहर आता मेडिकल हब म्हणून जाहीर व्हावं, अशी अपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञ आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. या शहरात ३५० रुग्णालयांतून नऊ हजार बेड्सच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार मात्र शहरात डॉक्टरांची संख्या कमी आहे. सध्या १७०० नागरिकांमागे एक डॉक्टर असून, हे प्रमाण ४०० रुग्णांमागे एक डॉक्टर असायला हवे, असेही सांगण्यात आले. डॉ. व्यंकटेश मेतन यांनी सोलापुरातील मेडिकल टूरिझम या विषयावर संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनानुसार सोलापुरात उपचार घेणाºया रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण हे आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील आहेत. सोलापुरात स्वस्त व चांगले उपचार मिळत आहेत. येत्या पाच वर्षांत पुणे येथील रुग्ण सोलापुरात येण्याच्या संख्येत वाढ होईल, आता याची सुरुवात झाल्याचे डॉ. मेतन यांनी सांगितले.
वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने नियमानुसार प्रत्येक ४०० लोकांच्या मागे एक डॉक्टर असणे अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक हजार ७०० लोकांच्या मागे एक डॉक्टर आहे. आयुर्वेद, होमिओपॅथिक व युनानी डॉक्टरांची एकूण संख्या पाहता ७०० नागरिकांच्या मागे एक डॉक्टर आहे.
फॅमिली डॉक्टरांच्या संख्येत घट
- एमबीबीएस झाल्यानंतर जनरल प्रॅक्टीस करण्यापेक्षा स्पेशलायझेशन करण्याकडे डॉक्टरांचा कल आहे. यामुळे फॅमिली डॉक्टर्सची संख्या कमी होत आहे. शहरात प्राथमिक सेवा देणाºया एमबीबीएस डॉक्टरांची संख्या सुमारे ३० ते ४० आहे. ग्रामीण भागात सेवा देणाºयांमध्ये एमबीबीएसपेक्षा बीएएमएस डॉक्टरांची संख्या जास्त आहे.
सोलापूरची भौगोलिकता व तुलनेने मिळणारे स्वस्त उपचार यामुळे येथे येणाºया रुग्णात वाढ होत आहे. मेट्रो शहराच्या तुलनेत सोलापुरात ४० टक्क्यांनी स्वस्तात उपचार होतात. सोलापुरातील डॉक्टर हे रुग्णाशी चांगला संवाद साधतात, हे देखील याचे एक महत्त्वाचे कारण आहे, तर मेट्रो शहरामध्ये डॉक्टर फक्त एकदाच रुग्णाला भेटतात.
- डॉ. व्यंकटेश मेतन
माजी अध्यक्ष, आयएमए
रुग्णसेवा करणे हे डॉक्टरांचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. सध्या रक्तदानाविषयी जागृती पसरवणे, तंबाखूपासून नागरिकांना परावृत्त करणे व वाढत्या लठ्ठपणाचे दुष्परिणाम समजावून सांगणे गरजेचे आहे.
- डॉ. पुष्पा अग्रवाल
अध्यक्ष, आयएमए
ग्रामीण भागात सेवा देण्यामध्ये तसेच सर्वच ठिकाणी प्राथमिक सेवा देण्यामध्ये बीएएमएस, होमिओपॅथिक व युनानी डॉक्टर आघाडीवर आहेत. साध्या आजारासाठी कन्सल्टंटकडे जाणे सामान्य रुग्णांना परवडणारे नसते. जनरल प्रॅक्टीस करणारे डॉक्टर महत्त्वाची भूमिका बजावतात.
- डॉ. विनायक टेंभुर्णीकर
केंद्रीय अध्यक्ष निमा