Solapur Siddeshwar Yatra ; यंदाही रस्ता मोकळाच, पाळणे, स्टॉल्स होम मैदानावरच ; मात्र कंपाउंडला धक्का लागल्यास नुकसानभरपाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 10:58 AM2018-12-18T10:58:13+5:302018-12-18T10:59:10+5:30
यात्रा सिद्धरामांची : पंचकट्टा कार्यालयाचा विधिवत शुभारंभ; स्टॉल बुकिंगला सुरुवात
सोलापूर : जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे असताना आपत्कालीन रस्ता मोकळा सोडण्याची अट यंदाही पंचकमिटी पाळणार असून, होम मैदानावरच पाळणे, स्टॉल्स असणार आहेत, हे स्पष्ट करताना श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी होम मैदानाच्या भोवताली असलेल्या कंपाउंडला धक्का लागल्यास नुकसानभरपाईची जबाबदारीही स्वीकारली.
सोमवारी सकाळी १०.३० वाजता सिद्धेश्वर पेठेतील ६८ पैकी ५० वे सर्वेश्वर लिंगाची आणि ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे धर्मराज काडादी, गुंडप्पा कारभारी यांच्या हस्ते पूजा करुन पंचकट्टा कार्यालयाचा शुभारंभ केला. त्यानंतर भगवा ध्वज फडकावून होम मैदान ताब्यात घेतले. त्यावेळी काडादी पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी पंच कमिटीचे सदस्य तथा यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबुराव नष्टे, सदस्य बाळासाहेब भोगडे, सिद्धेश्वर बमणी, गिरीष गोरनळ्ळी, मल्लिकार्जुन कळके, वेदमूर्ती बसवराज शास्त्री, अश्विन स्वामी, चिदानंद स्वामी, विश्वनाथ लब्बा, चिदानंद वनारोटे, काशिनाथ दर्गोपाटील, शिवकुमार पाटील, गौरीशंकर डुमणे, बसवराज अष्टगी, सुरेश म्हेत्रे, संतोष बाणेगाव, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुदीप चाकोते, शिवसेनेचे शाहू शिंदे आदी भक्तगण उपस्थित होते.
पंचकट्टा येथील कार्यालयाच्या शुभारंभानंतर पंच कमिटीचे सदस्य, मानकरी, भक्तगण होम मैदानाकडे रवाना झाले. स्मार्ट सिटी अंतर्गत होम मैदानाच्या चोहोबाजूनी संरक्षक भिंत आणि ८ प्रवेशद्वार उभे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसमोरील गेटचे धर्मराज काडादी यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर प्रवेशद्वार उघडताच काडादी यांच्यासह सदस्य, भक्तगणांनी पाऊल ठेवले.
भगवा ध्वज फडकावून होम मैदान ३१ जानेवारीपर्यंत पंच कमिटीच्या ताब्यात मिळाल्याचे जणू संकेत मिळाले.
पंचकट्टा कार्यालयाच्या शुभारंभानंतर स्टॉल्स बुकिंगला सुरुवात होते. दोन दिवसांमध्ये पंचकट्टा परिसर, होम मैदानावरील स्टॉल्सचा आराखडा तयार होईल. आराखड्याचे काम वास्तुविशारद ऋषीकेश पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.
-बाळासाहेब भोगडे, अध्यक्ष- यात्रा स्टॉल समिती
कमिटी काळजी घेईल
- होम मैदानावरील प्रवेशद्वाराचे पूजन झाले. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सुशोभीकरणानंतर धर्मराज काडादी यांच्यासह पंच कमिटीच्या सदस्यांनी पहिलेच पाऊल होम मैदानावर टाकले. होम मैदानाच्या सुशोभीकरणाला कुठे बाधा होणार नाही, याची काळजी पुरेपूर पंच कमिटी घेईल, असे सांगताना धर्मराज काडादी यांनी पाळणे, इतर स्टॉल होम मैदानावरच असतील, याचे स्पष्टीकरण दिले.
होम मैदान उजळणार !
- स्मार्ट सिटी अंतर्गत रंगभवन आणि होम मैदानाच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या होम मैदानाच्या भोवताली संरक्षक भिंत बांधण्यात आली असून, त्यावरील लोखंडी ग्रीलवर दिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे यात्रा काळात होम मैदान लख-लख दिव्यांनी उजाळणार आहे.