Solapur Siddeshwar Yatra ; सत्यम सत्यम, दिड्डम, दिड्डम म्हणताच दाही दिशांनी सम्मती कट्यावर झाली अक्षतांची बरसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 03:45 PM2019-01-14T15:45:57+5:302019-01-14T15:47:15+5:30
सोलापूर : सम्मती कट्याजवळ उभे असलेले मानाचे सातही नंदीध्वज, शेजारी विस्तीर्ण पसरलेला ६८ तीर्थवासांचा तलाव, ऐतिहासिक साक्ष देणारे भुईकोट ...
सोलापूर : सम्मती कट्याजवळ उभे असलेले मानाचे सातही नंदीध्वज, शेजारी विस्तीर्ण पसरलेला ६८ तीर्थवासांचा तलाव, ऐतिहासिक साक्ष देणारे भुईकोट किल्ल्याचे बुरूज, उन्हाची तीव्रता तरीही भक्तिरसाची अधूनमधून येणारी थंड हवेची सुखद झुळूक, शिवयोगी सिध्देश्वर महाराज की जयच्या घोषात फुलांनी सजविलेल्या सम्मती कट्टा (उमा महेश्वर लिंग) येथे सिध्दरामेश्वरांच्या योगदंडाचा कुंभारकन्येशी प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी आलेले लाखो भाविक, याची देही याची डोळा या अक्षता सोहळ्याने कृतकृत्य झाले. हा सोहळा दुपारी १२ वाजून ४२ मिनिटांनी पार पडला. सत्यम सत्यम दिड्डम दिड्डम मंगलाष्टका होताच दाही दिशांनी अक्षता बरसल्या.
या अपूर्व उत्साह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच सिध्दरामेश्वर तलाव परिसरातील विष्णु घाट, गणपती घाट, पार्क चौक, होम मैदान, पंचकट्टा मार्गावरून सम्मती कट्टाकडे भक्तांची मांदियाळी सुरु होती. सम्मती कट्टा परिसर भाविकांच्या गदीर्ने फुलून गेला होता. प्रतिक्षा होती नंदीध्वज आगमनाची. दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी वीरशैव पीठाचे पंचरंगी ध्वजाचे आगमन झाले. १२ वाजून ३५ मिनिटांनी मल्लिकार्जुनचे प्रतिक असलेले कावड, भगवा ध्वजाचे आगमन झाले. त्यानंतर श्रींची पालखी सम्मती कट्याजवळ आली. त्या पाठोपाठ खोबरे, लिंबूचे हार, बाशिगांनी सजलेले मानाचे सातही नंदीध्वज सम्मती कट्याजवळ येवून एका रांगेत उभे राहिले. त्यानंतर मुख्य धार्मिक विधींना प्रारंभ झाला.
सिध्दरामेश्वरांच्या योगदंडाच्या साक्षीने मानकरी राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख यांनी सुगडी पूजन केले. त्यानंतर कुंभार यांना हिरेहब्बू यांच्या हस्ते विडा देण्यात आला. त्यानंतर मानकरी सुहास शेटे यांनी सम्मती (मंगलाष्टक) हिरेहब्बू यांच्याकडे स्वाधीन केले. त्यानंतर महत्त्वाचा गंगापूजन हा धार्मिक विधी पार पडला. त्यानंतर दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी सम्मती वाचनास प्रारंभ झाला. सम्मती कट्टा परिसरात जमलेल्या हजारो भाविकांचे हात आकाशात उंचावले. सुहास शेटे यांच्याकडून पाच वेळा सम्मती वाचन झाल्यानंतर दुपारी १२ वाजून ४२ मिनिटांनी सत्यम सत्यम, दिड्डम, दिड्डम म्हणताच दाही दिशांनी सम्मती कट्यावर अक्षतांची बरसात झाली. डोळ्याचे पारणे फेडणाºया या अक्षता सोहळ्यात लाखो अबालवृध्दांनी सहभाग घेतला.