सोलापूर सिद्धरामेश्वर यात्रेतील भाकणूक; यंदा भरपूर पाऊस; भय, भीती संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:17 PM2019-01-16T12:17:35+5:302019-01-16T12:21:01+5:30
सोलापूर : यंदा भरपूर पाऊस पडेल. त्यामुळे शेतकºयांचे जीवनमान उंचावेल. धान्यांसह इतर वस्तूंचे दर स्थिर राहतील, असे भाकीत मानकरी ...
सोलापूर : यंदा भरपूर पाऊस पडेल. त्यामुळे शेतकºयांचे जीवनमान उंचावेल. धान्यांसह इतर वस्तूंचे दर स्थिर राहतील, असे भाकीत मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी मंगळवारी रात्री ११.२५ वा. भाकणुकीवरुन वर्तविले.
होम मैदानावर होमप्रदीपन सोहळा संपन्न झाल्यावर सातही नंदीध्वज मिरवणुकीने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोर आले. तत्पूर्वी ११.१० वा. मानकरी देशमुख यांच्या शेतातील वासराला भाकणूकस्थळी आणण्यात आले. मानकरी राजशेखर देशमुख, मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी वासराचे विधिवत पूजे केले. त्यानंतर दिवसभर उपाशी ठेवलेल्या वासरासमोर विविध धान्य, गूळ, खोबरे, ऊस, खारीक, बोरे, सुपारी, पान ठेवण्यात आले. वासराने मूत्रविसर्जन केले. त्यावरून यंदा भरपूर पाऊस पडणार असल्याचे संकेत हिरेहब्बू यांनी दिले.
वासराने एकाही वस्तूला स्पर्श केला नाही. त्यावरून धान्यांसह सर्वच वस्तूंचे दर स्थिर राहतील, महागाई असणार नाही, असेही हिरेहब्बू यांनी भाकणुकीनंतर सांगितले. वासरासमोर पेटता टेंभा धरण्यात आला, तरीही ते शांत उभे होते. त्यामुळे या वर्षात भय, भीती दूर होईल, चिंतेचे कसलेच कारण नसल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, सुदेश देशमुख, सुधीर देशमुख आदी उपस्थित होते.