सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; शहराच्या पंचक्रोशीत पूजनाची लगबग, दुचाकीवरून नंदीध्वज निघाले गावोगावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:30 PM2018-12-31T13:30:05+5:302018-12-31T14:03:47+5:30
सोलापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील योगदंडाचे प्रतीक असलेले नंदीध्वज पेलण्याचा सराव अंतिम टप्प्यात आला आहे. यात्रेच्या अगोदर आपल्या घरी ...
सोलापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील योगदंडाचे प्रतीक असलेले नंदीध्वज पेलण्याचा सराव अंतिम टप्प्यात आला आहे. यात्रेच्या अगोदर आपल्या घरी नंदीध्वज पूजनासाठी यावेत अशी प्रत्येक भक्तांची इच्छा असते. सोलापूर शहर परिसरातील गावोगावी हे नंदीध्वज मोटरसायकलवरून पूजनासाठी घेऊन जातानाचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
शहर विस्तारीकरणासोबत विभक्त झालेल्या कुटुंबांची वाढती संख्या व प्रत्येक कुटुंबाची ग्रामदैवतावरील श्रद्धा यामुळे यंदा यात्रेतील सराव नंदीध्वजांचे पूजन यंदा लवकरच सुरू झाले आहे. दरवर्षी कार्तिक अमावस्येला मल्लिकार्जुन मंदिरातील सराव काठी पूजनानंतर घरोघरी व परिसरातील ग्रामीण भागातील भक्तांकडे पूजनाला सुरुवात होत असे. यंदा दहा-पंधरा दिवस अगोदरच काठी पेलण्याचा सराव आणि पूजनासही सुरुवात झालेली दिसत आहे.
यात्रा जवळ येते तशी पूजा करणाºयांची संख्या वाढत जाते. शहरातील पूजनासोबत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पूजा होतात. दिवसभर पूजेसाठी असलेल्या काठ्या रात्री उशिरा सरावासाठी उपलब्ध होतात. यामुळे नंदीध्वज धारकांची दमछाक होत आहे.
वाढत्या पूजांमुळे एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी नंदीध्वज मोटरसायकलवरून घेऊन जावे लागतात. मागील दोन-तीन वर्षांपासून अशा प्रकारे नंदीध्वज वाहून नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचे पालन पूर्णत: होत नसले तरी काठी घेऊन जाताना भक्तांकडून होणारी आरडाओरड, गोंधळ जवळपास बंद झाला आहे.
शहरात नंदीध्वज खांद्यावर वाहून नेले जातात; मात्र ग्रामीण भागात मोटरसायकलवरून नेण्याशिवाय पर्याय नाही. शहराबाहेरील तुळजापूर रोडवर हिप्परगा, एकरुख, उळे येथे पहिले व दुसरे सराव नंदीध्वज जाताना दिसून आले. तर माळी समाजाची तिसरी सरावकाठी अक्कलकोट रोडवर कुंभारी, वळसंग भागात फिरत होती. रविवारी पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत गर्द धुक्यातून वाट काढत कुंभारीच्या गेनसिद्ध मंदिराकडे जाणाºया चौथ्या सराव काठीचे भक्तगण दिसले.
कुंभारी, कोन्हाळीपासून मंगळवेढ्यापर्यंत असते पूजेचे निमंत्रण
- शहराजवळील ग्रामीण भागात अक्कलकोट रोडवरील कुंभारी, कोन्हाळी, तोगराळी, हणमगावपासून ते वळसंगपर्यंत तुळजापूर रोडवर हिप्परगा, उळे, एकरुख,कासेगाव ते तामलवाडीपर्यंत, होटगी रोडवर कुमठे, हतुरेवस्ती, होटगी, आहेरवाडी, बंकलगी परिसरात पुणे रोडवरील बाळे, केगाव, कोंडी परिसरात पूजेला जातात. देगाव रोडवर बेगमपूर, माचणूर, मंगळवेढ्यापर्यंत भाविकांची पूजनासाठी मागणी असते.
शहरात पूजनाचे १८ नंदीध्वज
- नंदीध्वज ३० ते ३५ फूट लांबीचे असतात. वजन १०० ते १२५ किलो असते. दुचाकी गाडीवरून नेताना खेळणा पुढच्या बाजूस तर गुडी मागच्या बाजूस असते. प्रत्येक दुचाकीवर एक चालक व दोघे काठी धरतात. काही वेळेस मध्यभागी तिसरी गाडीसुद्धा वापरून काठी वाहून नेतात. शहरात १८ सराव नंदीध्वज असून दररोज ग्रामीण भागासह जवळपास ६० ते ७० ठिकाणी पूजन करण्यात येत आहे.
वाढत्या पूजा व ग्रामीण भागातील भक्तांना पूजेची सेवा मिळावी यासाठी लांब अंतर असलेल्या ठिकाणी मोटरसायकलवरून काठी वाहून नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. सिद्धेश्वर महाराजांचा जयजयकार करीत, डोक्यावर टोपी घालून, गोंधळघाई न करता काठी वाहून नेली जाते, याचे समाधान वाटते.
- राजशेखर हिरेहब्बू, मानकरी, नंदीध्वज