सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; मैदानावर यंदा म्हणे ओन्ली ‘होम’; जनावरांसाठी लक्ष्मी-विष्णू मिल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:11 PM2018-12-13T12:11:47+5:302018-12-13T12:13:02+5:30
महापालिकेच्या भूमिकेकडे लक्ष : बदलत्या ‘स्मार्ट सिटी’त नवे निर्णय घेण्यावर भर
सोलापूर : ग्रामदैवत सिध्देश्वरांच्या यात्रेनिमित्त गेली अनेक वर्षे रेवणसिध्देश्वर मंदिरासमोरील पटांगणात भरणारा जनावरांचा बाजार यंदा लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेत भरविण्यात यावा, असा पर्याय महापालिका प्रशासनाने सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीसमोर ठेवला आहे. होम मैदानावर पूजा-अर्चा व्हावी, मनोरंजन किंवा बाजारासाठी शहरातील इतर जागा आहेतच, असे मतही मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी नोंदविले.
सिध्देश्वर यात्रेच्या निमित्ताने महापालिका आणि देवस्थान पंचकमिटीमध्ये चर्चेच्या फेºया सुरू आहेत. पंचकमिटीच्या सदस्यांनी बुधवारी सकाळी मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. होम मैदानाचे पूर्वीचे रुप आणि आताचे रुप बदललेले आहे. त्यामुळे यंदा महापालिका प्रशासन मैदानाचे हस्तांतरण करताना काही निर्बंध लादणार असल्याची चर्चा आहे. याबाबत आयुक्त डॉ. ढाकणे म्हणाले, मैदानावर धार्मिक विधी व्हायला हवेत. मनोरंजन किंवा दुकानांसाठी शहरातील इतर जागा आहेत.
काळानुसार बदल झाला पाहिजे. कायदे आणि नियम पाळून यात्रा झाली पाहिजे. सध्या केवळ चर्चा सुरू आहे. जनावरांच्या बाजारासाठी लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेचा पर्याय आहे. ही जागा पाहून घ्या, असे देवस्थान समितीला सांगण्यात आलेले आहे. प्राणी संग्रहालयामुळे या भागात बाजार भरविता येणार नाही.
मैदानावर ७० एमएमचा स्क्रीन लावणार
- होम मैदान हे खेळासाठी होते हे आपण विसरुन आहोत, असे सांगून आयुक्त डॉ. ढाकणे म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानावर मनोरंजनासाठी ७० एमएमचा स्क्रीन लावण्याचा विचार आहे. सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशनच्या २० डिसेंबरला होणाºया बैठकीत या कामाला मंजुरी घेण्यात येईल. या स्क्रीनवर धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता येतील.
प्राणी संग्रहालयापासून ५०० मीटर अंतरापर्यंत जनावरांचा बाजार भरवू नये, असे नियम राष्टÑीय चिडीयाघर प्राधिकरणाने घालून दिले आहेत. सोलापूरच्या जनावरांच्या बाजारात कर्नाटकातूनही जनावरे येतात. हिवाळ्यामध्ये या जनावरांना पायखुरी, तोंडखुरीसारखे आजार होण्याची शक्यता असते. या जनावरांचे इन्फेक्शन त्यांच्या मालकालाही होऊ शकते. प्राणी संग्रहालयात काळवीट, सांबर, चितळ आदी प्राणी आहेत. त्यांना या जनावरांकडून किंवा मालकाकडून पायखुरी, तोंडखुरीसारख्या आजारांची बाधा होऊ शकते. त्यामुळे आम्ही प्राणी संग्रहालयाजवळ जनावरांचा बाजार भरवू नये, असे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे. बाजार भरला तर ते कायद्याचे उल्लंघन होईल.
- डॉ. शुभांगी ताजणे, प्राणी संग्रहालय प्रमुख.
यात्रेच्या नियोजनाबाबत महापालिका प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे. जनावरांचा बाजार किंवा होम मैदान याबाबत आताच काही बोलणे योग्य होणार नाही.
- बाळासाहेब भोगडे, सदस्य, देवस्थान पंचकमिटी.