सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; नंदीध्वज सरावासाठी सरसावले भावी अभियंते; सराव करताना बंद ठेवतात तीन तास मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:27 PM2018-11-30T12:27:42+5:302018-11-30T12:29:47+5:30
भक्ती अन् शक्तीचा संगम : मुलांमधील बदल माता-पित्यांना आनंद देणारा
रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : मोबाईलच्या जमान्यात पार रमून गेलेल्या तरुणाईला कसले कष्ट अन् कसला आलाय व्यायाम. मोबाईल एके मोबाईल, यालाच विश्व मानलेल्या भावी अभियंत्यांचे पाऊल नंदीध्वज सरावाकडे वळताना भक्ती अन् शक्तीचा संगमही पाहावयास मिळतो. सरावावेळी काही भावी अभियंते आपला मोबाईल तीन तास स्विचआॅफ, तर काही जण सायलेंटवर ठेवतात. सध्या नंदीध्वज सरावावेळी हे चित्र नेत्रांमध्ये टिपताना त्यांच्यात व्यायामाची गोडी लागत असल्याचे प्रखरपणे दिसले.
दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसºया सप्ताहात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा भरते. तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम प्रदीपन सोहळा आणि शोभेचे दारूकाम या चार प्रमुख सोहळ्यादिवशी निघणाºया मिरवणुकीत नंदीध्वज पेलण्याच्या सरावाला सुरुवात झाली आहे. दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. त्यानंतर नोव्हेंबर महिना उलटला तर पुढे जानेवारी अखेरपर्यंत भरणाºया गड्डा यात्रेपर्यंत ‘आला थंडीचा महिना...’ या मराठी गाण्याचे स्मरण होते. थंडी अन् व्यायाम हे समीकरणही डिसेंबर ते जानेवारी आणि पुढे फेब्रुवारीपर्यंत पाहावयास मिळते.
नंदीध्वज पेलण्याचा सराव म्हणजे एक उत्तम व्यायामही आहे. एका शिस्तीत नंदीध्वज पेलत पुढे सरकणं म्हणजे योगाचे काही प्रकारही पाहावयास मिळतात. आजच्या तरुणाईवर बाबा रामदेवांचा खूप मोठा प्रभाव आहे.
कुठे तरी तो प्रभाव आजच्या तरुणाईला नंदीध्वज सरावाकडे आणण्याचा प्रयत्न करतोय. शहरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाºया मुलांना सक्ती नाही ना बंधन. ही मुले स्वत:हून महिना, दीड महिना आपल्या हातातील मोबाईलला थोडं बाजूला सारून सरावावेळी दत्त म्हणून हजर असतात. आपल्या मुलांमधील हा चांगला बदल पाहताना कुठल्या माता-पित्यांना आनंद होणार नाही.
मुलांची शारीरिक वाढ होणारे हेच वय असते. नेमक्या याच वयात व्यायामाची जोड मिळाली पाहिजे आणि ती जोड शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त सध्या सुरू असलेल्या नंदीध्वज सरावाने मिळवून दिली आहे.
आसिम सिंदगी, अप्पू शिरशी, प्रतीक थोबडे, अमित गुंगे, श्रीधर माळी, केदारनाथ म्हेत्रे, महांतेश गोरे, सतीश माळी, मल्लिनाथ म्हेत्रे ही तरुणाई सध्या हातातील खेळणं बनलेल्या मोबाईलला दूर सारत सरावात सहभागी होत आहेत.
ज्या-त्या मास्तरकडून घेतात धडे !
- श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या सातही नंदीध्वजांचे मास्तर ठरलेले असतात. नंदीध्वजधारकांना नंदीध्वज पेलण्याचा कसून सराव करून घेण्याची खूप मोठी जबाबदारी या मास्तर मंडळींवर असते. सध्या नंदीध्वज पेलण्याच्या सरावाला आता कुठे प्रारंभ झाला आहे. महाविद्यालयीन शिक्षण अन् अभ्यासातून वेळ काढून विद्यार्थी स्वत:हून आता सरावाला वेळ देताना त्यांच्यातील एक चांगला बदल पाहावयास मिळतो.
नंदीध्वज पेलण्याच्या सरावात महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी दिसत आहेत, ही चांगलीच बाब आहे. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या भक्तीनेच या मुलांमधील शक्तीचे दर्शन घडते. नंदीध्वज सराव म्हणजे व्यायाम अन् योगाचे काही प्रकारही या तरुणाईकडून घडताना आनंद वाटतो.
-राजशेखर हिरेहब्बू
मानकरी, श्री सिद्धरामेश्वर यात्रा.