सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; नंदीध्वजांचं पावित्र्य जपण्यासाठी यंदा बाराबंदीधारकांची नवी आचारसंहिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:01 PM2018-11-29T13:01:25+5:302018-11-29T13:04:09+5:30
रविवारी विशेष बैठक : तरुण पिढीला मार्गदर्शन करणार हिरेहब्बूंसह इतर मान्यवर
रेवणसिद्ध जवळेकर ।
सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धारामेश्वरांच्या यात्रेतील नंदीध्वज मिरवणूक यात्रेतील पावित्र्य जपण्यासाठी मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी एक पाऊल पुढे टाकले असून, बाराबंदीधारकांसाठी नवी आचारसंहिता आणली आहे. यात्रेच्या आधी नंदीध्वज सरावावेळीही ही आचारसंहिता लागू असणार आहे.
या आचारसंहितेची माहिती मानाचे सातही नंदीध्वजांच्या मास्तरांसह बाराबंदी परिधान केलेल्या नंदीध्वजधाºयांना देण्यासाठी रविवार दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यात विशेष बैठक बोलाविण्यात आल्याचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तैलाभिषेक सोहळ्यापासून यात्रेची मुख्य सुरुवात होते. त्यानंतर संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा, होम मैदानावर होम प्रदीपन आणि शोभेचे दारुकाम सोहळा पार पडतो. या चार सोहळ्यासाठी मानाचे सातही नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यापासून मिरवणुकीने पुढे मार्गस्थ होतात. मिरवणूक मार्गावर नंदीध्वजांचे पावित्र्य जोपासण्याचे काम काही जणांकडून होत नाही. हे पावित्र्य जोपासण्याबरोबर मिरवणुका वेळेत पोहोचविण्याची आपल्यावर जबाबदारी असून, ती जबाबदारी यंदा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रविवारी नंदीध्वजधारकांची खास बैठक बोलाविण्यात आल्याचे राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले. बहुतांश मंडळी बाराबंदी घालून मिरवणुकीत सहभागी होतात. बाराबंदी घालून जर कुणी चुकीचे कृत्य करीत असेल तर त्यांना तेथेच तंबी देऊन त्यांच्या अंगावरील बाराबंदी काढून घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत होणार व्यसनमुक्तीचा जागर
- सराव अन् यात्रा सोहळ्यात नंदीध्वजांचे पावित्र्य राखण्याचे काम नंदीध्वजधारी करीत असतात; मात्र काही जणांकडून पावित्र्य राखले जात नसल्याच्या तक्रारी माझ्या कानावर येत असतात. किमान यात्रेच्या काळात तरी तंबाखू, गुटखा, मावा आदी व्यसनांना फाटा दिला पाहिजे. यासाठीच एक आचारसंहिता तयार केली जाणार असल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले.
अक्षता सोहळा वेळेतच पार पाडू
- ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळा हा प्रमुख सोहळा असतो. सोहळ्यासाठी सोलापूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातील आणि लगतच्या कर्नाटक, आंध्रातील भाविक येत असतात. काही भाविक सकाळी ९ वाजल्यापासून संमती कट्टा परिसरात बसलेले असतात. ऊन आणि पाण्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याचा विचार करून यंदा अक्षता सोहळा अगदी वेळेत पार पाडण्यासाठी कटिबद्ध असल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले.
यात्रेतील पावित्र्य जपण्याचे काम तमाम श्री सिद्धरामेश्वर भक्तांचे आहे. हे पावित्र्य अधिक प्रभावीपणे जपण्यासाठीच आचारसंहिता करण्याची वेळ आली आहे. त्यानुसारच ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धारामेश्वरांच्या यात्रेतील प्रमुख सोहळे यशस्वीपणे पार पाडण्यात येतील.
-राजशेखर हिरेहब्बू
मानकरी- श्री सिद्धरामेश्वर यात्रा.