सोलापूर एसएमटीकडे राहिल्या फक्त ३१ बसेस,प्रवाशांना मिळतेय अपुरी सेवा
By Admin | Published: May 6, 2017 06:10 PM2017-05-06T18:10:04+5:302017-05-06T18:10:04+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५ : एसएमटीला (मनपा परिवहन) केंद्रीय योजनेतून मिळालेल्या अशोक लेलँड कंपनीच्या ८७ जनबस चेसी क्रॅक झाल्यामुळे धक्क्याला लागल्याने ताफ्यात फक्त ३१ बस राहिल्याने प्रवासी सेवा धोक्यात आली आहे.
एसएमटीला केंद्रीय योजनेतून १४५ बस मिळाल्या होत्या. त्यात १00 जनबस आहेत. या बस मार्गावर धावताना चेसी क्रॅक झाल्या. आरटीओने तपासणी करून बसचे फिटनेस रद्द केले. त्यानंतर सुनावणी घेऊन या बसची नोंदणी रद्द केल्याने बस भंगारात निघाल्या आहेत. उर्वरित ११ बसच्या चेसी क्रॅक झाल्याबाबत एसएमटीने आरटीओला कळविले आहे. त्यामुळे या बस डेपोत थांबविण्यात आल्या आहेत. शनिवारी आरटीओच्या पथकामार्फत या बसची तपासणी करून अहवाल दिला जाणार आहे. यातील एक जनबस अद्याप रस्त्यावर धावत आहे. याही बसची तपासणी केली जाणार असल्याने बस डेपोत थांबवून ठेवण्याबाबत आरटीओने कळविले आहे. त्यामुळे आता प्रवासी सेवा देण्यासाठी एसएमटीकडे फक्त ३0 बस शिल्लक राहिल्या आहेत. यातून ग्रामीण व शहरी भागात वेळेवर सेवा देणे एसएमटीला अशक्य होणार आहे. यातील बसचा खोळंबा झाला तर मार्गावरील प्रवासी लटकले जाणार आहेत. सध्या सुट्टी व लग्नसराईचा काळ आहे. असे असताना एसएमटीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
केंद्रीय योजनेतून १४५ बसचा ताफा आल्यावर एसएमटीने ३00 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली. शहरी सेवा देत बस शिल्लक राहिल्याने तुळजापूर, अक्कलकोटला सेवा देण्यासाठी ६0 किलोमीटरची मर्यादा वाढवून द्या म्हणून शासनाकडे मागणी लावून धरण्यात आली. या विषयावर मंत्रालयात बऱ्याच वेळा बैठका झाल्या. पण यात्रा काळात एसएमटीला सेवा पेलवता आली नसती, याशिवाय राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील सेवेला हरकत घेतल्यावर प्रकरण शांत झाले. आज एसएमटीकडे शहरातील नागरिकांना पुरेशी सेवा देण्याइतपत बस नाहीत. ७ व ८ मार्गावर प्रवासी असूनही सेवा देण्यास बस नाहीत. त्यामुळे या मार्गावर रिक्षा भरून वाहत आहेत. गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागातील अनेक ठिकाणांच्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ना एसटी, ना सिटीबस अशी या गावातील नागरिकांची आता अवस्था झाली आहे.