Solapur: प्रवाशांना सुरक्षित नेणाऱ्या ‘एसटी’चं सोलापूर स्टॅन्डचं बनलंय धोकादायक
By बाळकृष्ण दोड्डी | Published: March 3, 2023 02:31 PM2023-03-03T14:31:19+5:302023-03-03T14:31:57+5:30
Solapur: एसटी विभागाच्या रोकड कार्यालयाची इमारत कमकुवत झाली असून छताचे तुकडे खाली पडत आहेत. आगार प्रमुख कार्यालयाची हीच अवस्था आहे. एसटी कार्यालयाच्या प्रमुख इमारतीला डागडुजी गरज आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे.
- बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : एसटी विभागाच्या रोकड कार्यालयाची इमारत कमकुवत झाली असून छताचे तुकडे खाली पडत आहेत. आगार प्रमुख कार्यालयाची हीच अवस्था आहे. एसटी कार्यालयाच्या प्रमुख इमारतीला डागडुजी गरज आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात कर्मचारी छताखाली बादली लावून पावसाचे पाणी अडवतात तर दुसरीकडे या परिस्थितीला कंटाळलेले कर्मचारी दुसऱ्या आगारात बदली मागतात. यावरून येथील परिस्थितीचा अंदाज येईल.
याबाबत माहिती घ्यायला गेल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. छत कधी पडू शकते, अशी छताची अवस्था झाली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही छताची दुरुस्ती होईना. याचा त्रास जसा कर्मचाऱ्यांना होत आहे. तसा त्रास आगार प्रमुख कार्यालयात येणाऱ्या प्रवाशांनाही होतो.
एसटी आगार परिसरात रोज हजारो प्रवासी येतात. तशी आगार प्रमुख कार्यालयाची इमारत चांगली दिसते. परंतु इमारतीचे छत कमकुवत झाले आहे. छतामधील लोखंडी सळई स्पष्ट दिसत आहेत. अनेक ठिकाणी चिरा पडल्या आहेत. संपूर्ण छताची बाजू काळी पडली असून अनेक ठिकाणी छताचे तुकडे निघालेली दिसतात. रोकड कार्यालयात नेहमी गर्दी असते. या ठिकाणी कॉम्प्युटर देखील आहेत. कॉम्प्युटर कार्यालय पाठीमागील हॉल मध्ये कंडक्टर आपल्या पेट्या ठेवतात. तेथील छत संपूर्ण काळी पडली आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे डाग दिसतात. या इमारतीतील जीना देखील जीर्ण झाला आहे.