राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळपात सोलापूर तर उताऱ्यात कोल्हापूर सरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 03:23 PM2021-01-23T15:23:36+5:302021-01-23T15:23:54+5:30
अडचणी दूर करीत हंगामाने घेतला वेग
सोलापूर : राज्यात ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला आहे. गाळपात सोलापूर जिल्हा राज्यात आघाडीवर असून उताऱ्यात मात्र, कोल्हापूर सरस ठरले आहे.
यंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने साखर हंगाम सुरू होण्यासाठी काही जिल्ह्यांत अडचणी आल्या होत्या. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू झाले. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर उजाडला. मागील अडीच महिन्यांत ऊस गाळपाने चांगला वेग घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २९ तर कोल्हापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. राज्यात गाळप सुरू असलेल्या साखर कारखान्यांची संख्या सर्वाधिक आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवारपर्य॔ंत ९६ लाख ३७ हजार ४०२ मेट्रीक टन गाळप झाले आहे तर ८६ लाख २६ हजार ८९६ क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उतारा राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी ८.९५ टक्के इतका पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी ८६ लाख ८८ हजार २२९ मेट्रीक टन गाळप तर ९९ लाख ३८ हजार ७९४ क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उतारा राज्यात सर्वाधिक ११.४४ टक्के इतका पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात २१ साखर कारखान्यांनी ७० लाख ७ हजार तर पुणे जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी ७१ लाख ३० हजार ७२२ मेट्रीक टन गाळप केले आहे.
राज्यात सहकारी ९० तर ९२ खासगी असे १८२ साखर कारखाने सुरू असून ५ कोटी ५३ लाख ३८ हजार मेट्रीक टन इतके गाळप झाले आहे. ५४० लाख ७२ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा साखर उतारा ९.७७ टक्के इतका पडला आहे. राज्यात खासगी ९२ साखर कारखाने सुरू असून त्यापैकी सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाअंर्तगत सर्वाधिक २७ तर सोलापूर जिल्ह्यात १८ व उस्मानाबाद जिल्ह्यात ८ कारखान्यांचा समावेश आहे. साखर उतारा सोलापूर जिल्हा सर्वांत कमी ८.९५ टक्के , उस्मानाबाद ९.५ टक्के, पुणे ९.९ टक्के, सातारा जिल्ह्यात १०.४१ टक्के, सांगली ११.२२ टक्के तर कोल्हापूर ११.४४ टक्के याप्रमाणे आहे.