सोलापूर राज्य उत्पादन विभाग अलर्ट; पाच महिन्यात दारू तस्करी करणारे ६४३ जण अटकेत
By Appasaheb.patil | Published: September 5, 2022 01:22 PM2022-09-05T13:22:02+5:302022-09-05T13:22:11+5:30
चोरट्या मार्गाने जाणारी विदेशी व परदेशी दारू जप्त करण्यातही उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांत अचानक धाडी टाकून मोठ्या कारवाया यशस्वी केल्या आहेत. सर्वाधिक कारवाया या मुळेगाव, बक्षीहिप्परगा व अन्य तांड्यावर करून या भागात तयार होणारी हातभट्टी दारू व रसायन जप्त केले आहे. शिवाय चोरट्या मार्गाने जाणारी विदेशी व परदेशी दारू जप्त करण्यातही उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. पोलीस अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली पाच ते सात विभागांतील पथके सातत्याने कारवायांच्या मोहीम राबवित आहे.
-----------
७४६ गुन्हे अन् ६४३ जणांना अटक
अवैध दारू विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच महिन्यांत एकूण ७४६ गुन्हे नोंदविले असून, त्यात ६८१ वारस गुन्हे असून, ६४३ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या पाच महिन्यांत एक्साइज विभागाने जिल्ह्यात सर्वत्र कारवाई करून मोठी खळबळ उडवून दिली आहे.
----------
जप्त केलेला मुद्देमाल
- - हातभट्टी दारू -२०७५९ लिटर
- - देशी दारू - १७८५ लिटर
- - विदेशी दारू - ५९२ लिटर
- - बिअर - ६८६ लिटर
- - ताडी - ६४२९ लिटर
- - परराज्यातील दारू - २६३२ लिटर
- - हातभट्टीचे रसायन - २ लाख ५३ हजार लिटर
---------
७५ वाहने केली जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आजपर्यंत केलेल्या कारवाईत ७५ वाहने जप्त करण्यात एक्ससाइजला यश आले आहे. यात अनेक हातभट्टीचालकांनी गाडी तसेच टाकून पळून गेल्याच्याही घटना आहेत. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने कायदेशीर कारवाई केली.
------------
राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध दारू, ताडी विक्री, निर्मिती, वाहतुकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू, ताडी निर्मिती, वाहतूक, विक्री,साठा, बनावट दारू, परराज्यांतील दारू याबाबत माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवा.
- नितीन धार्मिक, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर