प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी पाटील यांना दोन लाखांची लाच घेताना अटक
By रूपेश हेळवे | Published: December 22, 2022 12:15 PM2022-12-22T12:15:10+5:302022-12-22T12:17:16+5:30
रक्कम स्वत: स्विकारताना पाटील यांना बुधवारी रात्री सात रस्ता परिसरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले.
सोलापूर: साखर कारखान्याविरुद्ध केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरिता तसेच परवाना देण्यासाठी मदत केल्याप्रकरणी दोन लाखांची लाच घेताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास केली. अजित वसंतराव पाटील (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदाराचे साखर कारखान्याचे डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी केलेल्या मदती पोटी, साखर कारखान्याकडून हवा व पाणी प्रदूषण होत असल्याबाबत कारखान्याच्या आजूबाजूच्या लोकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. या साखर कारखान्याचा फार्मासिटिकल युनिटचे कंसेन्टन्स टू एस्टॅब्लिश हे लायसन्स प्रस्तावित होते. ही सर्व कामे करण्यासाठी तसेच नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी उपप्रादेशिक अधिकारी पाटील यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली होती. ती रक्कम स्वत: स्विकारताना पाटील यांना बुधवारी रात्री सात रस्ता परिसरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"