सोलापुरात सूर्य आग ओकू लागला; पारा ४२़९ अंशावर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 01:52 PM2020-05-04T13:52:09+5:302020-05-04T13:53:33+5:30
आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद; कोरोनाबरोबर उकाड्याचे दुहेरी संकट
सोलापूर : एकीकडे लॉकडाऊनमुळे घरात राहण्याशिवाय पर्याय नसताना दुसरीकडे तापमानाचा पारा वाढत आहे. अशा परिस्थितीत घरात थांबणेही कठीण झाले आहे. रोजच सोलापूरच्यातापमानाचा पारा वाढतच चालला आहे. रविवारी यावर्षीच्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात दररोज वाढ होत आहे. सूर्य आग ओकत असल्याने रविवारी सोलापूर चांगलेच तापले. शहराचा पारा ४२.९ अंशांवर गेला. यावर्षीच्या आजअखेरच्या सर्वाधिक तापमानाची रविवारी नोंद झाली. वाढत्या उष्म्याने सोलापूरकर हैराण झाले आहेत.
लॉकडाऊनमुळे घरात असल्याने पंखा, एसी, कुलर यांचा वापर देखील वाढला आहे. २८ एप्रिल रोजी ४० अंश सेल्सिअसवर असणाºया तापमानात रोज वाढ होताना दिसत आहे. रोज सरासरी ०.५ ते ०.८ अंश सेल्सिअसची वाढ होत आहे.
वाढत्या उष्म्याने जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सकाळपासूनच अंगातून घामाच्या धारा काढणाºया उष्म्याने दुपारी अंगाची लाहीलाही होत होती. गेल्या पाच दिवसांपासून तापमानात रोज वाढ होत आहे. रविवारी सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. सकाळपासूनच अंग घामाघूम होत होते. अनेक घरांत रात्रीपासून सुरू केलेले पंखे आज दिवसभर चालू होते.
लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नसले तरी अनेकांनी झाडाखाली, बागेत थांबणे पसंत केले. गारवा मिळावा म्हणून नागरिक कुलर, पंखे व इतर साधनांचा वापर करत असतात; मात्र लॉकडाऊनमुळे कुलर व पंखे आणि इतर साहित्याची खरेदी करता येत नाही. अथवा काही बिघाड असल्यास कारागीरसुद्धा घरी येत नसल्याने अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
वाढत असलेले तापमान
- - २८ एप्रिल - ४० अंश सेल्सिअस
- - २९ एप्रिल - ४०.८ अंश सेल्सिअस
- - ३० एप्रिल - ४१.३ अंश सेल्सिअस
- - १ मे - ४२. १ अंश सेल्सिअस
- - २ मे - ४२. ८ अंश सेल्सिअस
- - ३ मे - ४२.९ अंश सेल्सिअस
- - २१ मे २०१५ - ४३.८
- - २१ एप्रिल २०१६ - ४४.९
- - १८ एप्रिल २०१७ - ४३.८
- - २ मे २०१८ - ४३. ७
- - २१ मे २०१९ - ४५.०
रविवारी तीन मे रोजीचे तापमान हे यंदाच्या वर्षीचे सर्वाधिक आहे. मागील काही दिवसांपासून यात सातत्याने वाढ होत आहे. येत्या काळामध्ये वादळी वारा व पाऊस येण्याची शक्यता आहे. पाऊस आल्यास तापमानात घट होऊ शकते.
-मिलिंद हरहरे, मौसम वैज्ञानिक, हवामान कार्यालय, सोलापूर