उत्तर सोलापूर तालुक्यावर ‘उपग्रहाची वक्री नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 02:43 PM2018-10-25T14:43:17+5:302018-10-25T14:45:50+5:30
प्रशासन म्हणतंय पाणी पातळी घटली... पाऊस ४० टक्केच.. खरीपही गेल्याचा आमचा अहवाल
अरुण बारसकर
सोलापूर: पाणी पातळी दीड मीटरने खाली गेली.., पाऊस अवघा ४० टक्के पडला.., खरीप पीकही गेले... असा अहवाल उत्तर सोलापूर तालुका प्रशासनाने पाठविला. तरीही तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यात झाला नाही. आमचा अहवाल तर वस्तुस्थितीला धरुन होता परंतु उपग्रहाच्या आधारे शासन ट्रीगर-२ मध्ये समावेश करीत असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातच दुष्काळी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील चित्र पाहिल्यानंतर दुष्काळी परिस्थितीची जाणीव होते. उत्तर सोलापूर तालुक्यात सप्टेंबरअखेरपर्यंत ४० टक्के पाऊस पडला होता. या पावसाची आकडेवारी फुगली ती शहरातील नोंदीमुळे. तशा तालुकास्तरावरुन गेलेल्या अहवालात नोंद आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पाणी पातळी मोजणीत पाच वर्षांच्या तुलनेत १.४३ मि.मी. इतकी पाणी पातळी खोलवर गेली असल्याचे अहवालात म्हटले आहे.
खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी क्षेत्रापैकी पाहणीत कोंडी, कळमण व मार्डी येथील सर्वच पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे तर वडाळा व बीबीदारफळ येथील बागायती खालील क्षेत्र वगळून संपूर्ण क्षेत्राचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकाºयांच्या संयुक्त सहीने दिला होता. केवळ पावसावर अवलंबून असलेले बीबीदारफळ व गावडीदारफळचे तलाव कोरडे आहेत. हे सारे अहवालाच्या माध्यमातून कागदावर आणले असतानाही उत्तर तालुक्याचा ट्रीगर-२ मध्ये समावेश झाला नाही. अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार दुष्काळी परिस्थिती तर आहेच मात्र उपग्रहाने सर्वेक्षण केल्याने शासन दुष्काळ नसल्याचे सांगत आहे.
सर्वात कमी ऊस उत्तरमध्ये
तालुक्यातील मार्डी मंडलात अवघा ४७ मि.मी., वडाळा मंडलात १८० मि.मी. तर तिºहे मंडलात १३३ मि.मी. पाऊस पडला आहे. शहराच्या भागातील सोलापूर मंडलात ५७४ मि.मी. तर शेळगी मंडलात २३१ मि.मी. पावसाची नोंद आहे. ग्रामीण भागातील कमी व शहरातील अधिक पडलेल्या पावसाची बेरीज करुन पाऊस ४० टक्के इतकाच झाला. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वात कमी ३ हजार ७८५ हेक्टर ऊस उत्तर तालुक्यात आहे.
पिकाखालील क्षेत्र, वनस्पती निर्देशांक, मृद आद्रता(मातीतील ओलावा), भूजल पातळी निर्देशांक हे सॅटेलाईटद्वारे मोजले जातात. याशिवाय अन्य काही बाबींचा विचार करुन ट्रीगर-२ मध्ये तालुक्यांचा समावेश होतो. संपूर्ण जिल्ह्याचीच आम्ही माहिती पाठवली.
- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
तालुक्यात पाण्याची स्थिती कठीण आहे. खरीप पिके तर गेली, रब्बीची पेरणी होणे कठीण आहे. जनावरे कशी जगवायची हा मोठा प्रश्न आहे. पावसाने ना ओढा वाहिला ना पाणी साठले. संपूर्ण वर्षात एकही पीक आले नाही तर वर्षभर खायचे काय हा प्रश्न आहे.
- जितेंद्र साठे, उपसरपंच, वडाळा
पाऊस पडेल या अपेक्षेने जनावरे सांभाळली. पाऊस पडला नसल्याने आता वैरणीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सगळीकडेच वैरणीचा प्रश्न असल्याने जनावरे मातीमोल दराने विकावी लागत आहेत, जनावरे विकली तर करायचे काय अन् खायचे काय?, हा प्रश्न आहे.
- शिवाजी पाटील,
माजी उपसरपंच बीबीदारफळ