Solapur: मंगळवेढ्याजवळ टेम्पोची दुचाकीचा अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 12:05 PM2023-10-02T12:05:10+5:302023-10-02T12:05:23+5:30
Solapur Accident News: दुचाकी अन् टेम्पोची जोराची धडक लागून महिला जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील उजनी गेटच्या समोर घडली.
- मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा - दुचाकी अन् टेम्पोची जोराची धडक लागून महिला जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील उजनी गेटच्या समोर घडली. दरम्यान अवजड वाहतुकीस शहरात बंदी असताना प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे राजरोस अवजड वाहतूक होत असून या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत नागरिकांनी मंगळवेढा -पंढरपूर मार्गावर चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे.
कमल पांडुरंग साळुंखे (वय ५३, रा.जय भवानीनगर, संत चोखामेळा नगर, मंगळवेढा) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून पती पांडुरंग साळुंखे (वय.६१) हे या अपघातात जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पती पांडुरंग साळुंखे पत्नीला गोपनबाई बोराळे रोड येथील आज सकाळी पत्नीला सोडण्यास मोटरसायकल (एम एच १३ बीए ८१०९) वरून जात होते. याचवेळी दुचाकीला टेम्पोची धडक बसली. यात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
जड वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, अजित जगताप, राहुल सावजी, सुहास पवार , युवराज घुले, शंकर गांडूळे,प्रवीण खवतोडे, सोमनाथ बुरजे, पांडुरंग नकाते, हर्षद डोरले,विनायक कलुबरमे, प्रफुल्ल सोमदळे, मोहन हेबांडे, संभाजी घुले, दत्ता सारगर, अर्जुन ओमने यांच्या सह सप्तशृंगी नगर, चोखामेळा नगर, दामाजी नगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.