Solapur: सोलापूर जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना १४ जुलै रोजी होणार प्रसिद्ध
By संताजी शिंदे | Published: July 8, 2023 01:04 PM2023-07-08T13:04:44+5:302023-07-08T13:05:14+5:30
Gram Panchayat: जिल्ह्यात होणाऱ्या १०९ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचना १४ जुलैला प्रसिद्ध होणार आहे.
- संताजी शिंदे
सोलापूर - जिल्ह्यात होणाऱ्या १०९ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचना १४ जुलैला प्रसिद्ध होणार आहे. हा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी जाहीर केला आहे.
जिल्ह्यातील सप्टेंबर-ऑक्टोंबर २०२३ महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीतील आरक्षण निश्चित करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावून अधिकाऱ्यांच्या अध्यतेखाली आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जाती, महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला यांचे आरक्षण काढण्यात आले आहे.
प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेला (नमुना ब) जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली. त्यानंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले. २७ जून ते ३ जुलै दरम्यान प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करून घेण्यात आल्या. ७ जुलैला उपविभागीय अधिकारी यांनी हरकती विचारात घेऊन अभिप्राय दिला. १२ जुलैला उपविभागीय अधिकारी यांचा अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना-अ) जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला १४ जुलैला प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
आरक्षण सोडत काढण्यात आलेल्या गावांची संख्या
- ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडती पुढीलप्रमाणे : करमाळा-१६, माढा-१४, बार्शी-०५, मोहोळ-०२, पंढरपूर-०३, सांगोला-०४, माळशिरस-१०, मंगळवेढा-२७, दक्षिण सोलापूर-१०, अक्कलकोट-१८ असे एकूण १०९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.