सोलापुरात चौथ्यांदा होतेय लक्षवेधी तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:15 AM2019-04-01T10:15:26+5:302019-04-01T10:17:52+5:30

बारा लढती झाल्या दुरंगी : सुशीलकुमार शिंदे, आंबेडकर, जयसिध्देश्वरांच्या प्रचाराला गती

In Solapur, there is a fourth eye catching triangle | सोलापुरात चौथ्यांदा होतेय लक्षवेधी तिरंगी लढत

सोलापुरात चौथ्यांदा होतेय लक्षवेधी तिरंगी लढत

Next
ठळक मुद्देसोलापूर मतदारसंघात आजवर झालेल्या तिरंगी लढतींमध्ये तुल्यबळ उमेदवार आमने-सामने होतेसन २००३ (पोटनिवडणूक), २००४ ,२००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत दुरंगी सामना झालालोकसभेच्या १९९६ च्या निवडणुकीत जनता दलाच्या वतीने रविकांत पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे ही तिरंगी लढत अधिक रंगतदार झाली.

रवींद्र देशमुख

सोलापूर : स्वातंत्र्यानंतर सोलापूर मतदारसंघात झालेल्या अगदी पहिल्या लोकसभा निवडणुकीपासूनच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकला असता येथे चौथ्यांदा तिरंगी लढत होत आहे. १९८०, १९९६, १९९९ नंतर यंदाच्या २०१९ च्या निवडणुकीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर यांच्यातील ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. आजवरच्या पंधरा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात १२ दुरंगी लढती; तर दोन चौरंगी लढती झाल्या.

लोकसभेची आठवी अर्थात १९८० साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे (इंदिरा) गंगाधरपंत कुचन, जनता पार्टीचे पन्नालाल सुराणा आणि अर्स काँग्रेसच्या प्रभाताई झाडबुके यांच्यात तिरंगी लढत झाली. सुराणा आणि झाडबुके हे दोन बार्शीकर एकमेकांच्या विरोधात लढत असल्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी होती. इंदिरा गांधी यांच्या हयातीत ही निवडणूक झाली. त्यांचा करिष्मा संपूर्ण देशावर होता. त्यामुळे कुचन यांनी ५४ टक्के मत घेऊन ही निवडणूक आरामात जिंकली. सुराणा यांना ९९ हजार ४२१; तर प्रभातार्इंना ६५ हजार ७७ मतांवर समाधान मानावे लागले.

लोकसभेच्या १९९६ च्या निवडणुकीत जनता दलाच्या वतीने रविकांत पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे ही तिरंगी लढत अधिक रंगतदार झाली. काँग्रेसतर्फे धर्मण्णा सादूल आणि भाजपतर्फे लिंगराज वल्याळ हे निवडणूक रिंगणात उतरले होते. या तिरंगी लढतीचा लाभ भाजपला झाला. वल्याळ हे १,८४,०७५ मते घेऊन विजयी झाले. विशेष म्हणजे पाटील यांनी १,६६,९८८ मते घेऊन दुसरे स्थान पटकाविले; तर सादूल हे तिसºया स्थानावर फेकले गेले. त्यांना १,६२,९७८ मते मिळाली.

शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून १० जून १९९९ रोजी राष्टÑवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावर्षी झालेल्या लोकसभेच्या तेराव्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादी हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. सोलापुरात राष्टÑवादी काँग्रेसकडून डॉ. मुकेश तथा अरळप्पा गंगप्पा अबदुलपूरकर यांनी निवडणूक लढविली. या तिरंगी लढतीत काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे आणि भाजपच्या वतीने लिंगराज वल्याळ सहभागी होते. शिंदे यांनी ४७.४९ टक्के अर्थात २,८६,५७८ मते घेऊन विजय संपादन केला होता; तर वल्याळ यांना २,०९,५८३ मते मिळाली. डॉ. अबदुलपूरकर यांना केवळ १,०२,८०३ मते मिळू शकली.

सन २००३ (पोटनिवडणूक), २००४ ,२००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत दुरंगी सामना झाला. सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे २००३ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या प्रतापसिंह मोहिते - पाटील यांनी थेट लढतीत काँग्रेसचे आनंदराव देवकते यांचा पराभव केला होता. २००४ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या उज्ज्वलाताई शिंदे यांचा पराभव करून विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जिंकला होता. २००९ मध्ये भाजपने चित्रपट अभिनेते अ‍ॅड. शरद बनसोडे यांना उमेदवारी दिली. ही निवडणूक सुशीलकुमार शिंदे यांनी जिंकली; तर २०१४ मध्ये अ‍ॅड. बनसोडे यांनी शिंदे यांचा पराभव केला होता.

तुल्यबळ प्रतिस्पर्धी
- सोलापूर मतदारसंघात आजवर झालेल्या तिरंगी लढतींमध्ये तुल्यबळ उमेदवार आमने-सामने होते. यंदाच्या निवडणुकीतही अशीच लढत होत आहे. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी सुरूवातीचा वैयक्तिक भेटीगाठींचा टप्पा पूर्ण करून प्रत्यक्षात प्रचाराला प्रारंभ केला. आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तिसºयाच दिवशी जिल्ह्यात सभांचा धडाका लावला आहे; तर भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर यांनी वैयक्तिक भेटीगाठी पूर्ण करून रविवारपासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथून प्रचार सभांना प्रारंभ केला.

Web Title: In Solapur, there is a fourth eye catching triangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.