सोलापूर नव्हे थुंकापूर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:38 AM2019-03-12T10:38:25+5:302019-03-12T10:39:02+5:30
प्रत्येक गावाची, प्रत्येक शहराची वेगळी अशी ओळख असते. कोणे एकेकाळी अतिशय गलिच्छ असलेल्या सूरत शहराने आता एक अतिशय स्वच्छ ...
प्रत्येक गावाची, प्रत्येक शहराची वेगळी अशी ओळख असते. कोणे एकेकाळी अतिशय गलिच्छ असलेल्या सूरत शहराने आता एक अतिशय स्वच्छ शहर म्हणून नवी ओळख मिळवलेली आहे. नुकताच इंदोर शहराने सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार तिसºयांदा पटकावला आहे. पूर्वनियोजित शहर म्हणून चंदीगड किंवा नवी मुंबई हे आपणा सर्वांना परिचित आहेच. सोलापूरवर प्रेम करणारा सोलापूरचा नागरिक म्हणून सोलापूरच्या बाबतीत असाच मी विचार करीत होतो आणि सोलापूरने आजपर्यंत आपली कुठली नवी ओळख निर्माण केलेली आहे का, असा विचार माझ्या मनात आला. उत्तर काही सापडेना.
असाच एकदा माझ्या कारचा ड्रायव्हर आला नाही आणि जवळच जायचं होतं म्हणून मी दुचाकीने निघालेलो होतो. तेव्हा जे काही चित्र-विचित्र अनुभव आले तेव्हा मात्र सोलापूरच्या नव्या ओळखीची माहिती झाली. नव्हे, खात्री झाली. बºयाच दिवसांनी दुचाकीवरून निघाल्याने मला ट्रॅफिकचा आणि आजूबाजूने दुचाकीवरुन पुढे जात असलेल्या व्यक्तींचा अजिबात अंदाज नव्हता. मी आपला शांतपणे रस्त्याच्या डाव्या बाजूने दुचाकी चालवत निघालो होतो. माझ्या उजव्या बाजूने एक दुचाकी पुढे गेली आणि त्या दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेले सद्गृहस्थ अचानक डावीकडे वाकडे झाले. त्यांनी मोठ्या प्रमाणात तोंडातल्या लाल द्रव्याचा स्प्रे रस्त्यावर मारला. माझे नशीब थोर की मी त्या सद्गृहस्थापासून काही अंतरावर मागे होतो. अन्यथा माझ्या पांढºया शर्टवर लाल रंगांचे स्प्रे पेंटिंग झालेच असते. मी थोडक्यात बालंबाल बचावलो. आता मी सावध झालो होतो.
पुढच्या दुचाकीच्या मागे काही अंतर ठेवून माझी दुचाकी मी चालवत राहिलो. काही वेळाने उजव्या बाजूला रोड डिव्हायडर आला म्हणून मी माझा वेग कमी केला. सुदैव माझे की मी माझा वेग कमी केला. कारण आता पुढच्या दुचाकीवरच्या पुढे बसून दुचाकी चालवणाºया सद्गृहस्थाने शांतपणे उजव्या बाजूच्या डिव्हायडरवर वनवे होऊन आपल्या मुखातील पेलाभर द्रव्य रिते केले, जणू रोड डिव्हायडर म्हणजे महानगरपालिकेने खास अशा व्यक्तींची सोय व्हावी म्हणून बांधलेले एखादे मोठे थुंकीपात्रच असावे. पुन्हा जणू काही घडलेच नाही या अविर्भावात ते सुसाट्याने पुढे निघालेही. या घटनेनंतर मला एक छंद जडला. सोलापुरातल्या अशा विविध पध्दतीने विविध ठिकाणी थुंकणाºया व्यक्ती आणि वल्लींचा अभ्यास करण्याचा. मी कारमध्ये असूूू दे वा बाईकवर, मी माझा अभ्यास सुरु ठेवला. काही दिवसांतच अनेक नमुने पाहायला मिळाले. त्यातलेच काही नमुने आपणापुढे पेश करावेत, या इच्छेने हा लेखनप्रपंच...
गल्लीतले पुढारी शोभावेत असा पेहराव केलेले दोन तरूण. कर्कश आवाज करणारी बाईक. गर्दीच्या ठिकाणी नको इतका स्पीड. कपाळावर मोठा टिळा. कानाला हेडफोन. अचानकपणे स्पीड कमी करुन पुढचे पुढारी पचकन थुंकले. रस्त्याच्या डावीकडे, मागची व्यक्ती, तीही सोलापूरचीच. पण या प्रकाराला अनभिज्ञ असावी. दचकली आणि मोठ्याने पुढच्या व्यक्तीवर खेकसली, ‘का बे, दिसत नाही का?’. झालं. दोन्ही पुढाºयांचा पारा लगेच चढला. कटकन साईड स्टँड लावत गाडी रस्त्यावर उभी करुन दोघांनी त्या पादचाºयावर हल्लाबोल केला. ‘का? काय झालं बे? डावीकडं थुंकलो की. रस्ता काय तुझ्या बापाचा आहे काय?’ रस्त्याच्या डावीकडून चालावे हा नियम सर्वांनाच माहिती असलेला, पण डावीकडे थुंकणेपण कायदेशीर आहे, हे ज्ञान मात्र आजच मला प्राप्त झाले. पुढचा डायलॉग होता, ‘का? अंगावर उडलं का?’ म्हणजे अंगावर उडलं तरच गुन्हा, अन्यथा नाही. पण मस्ती एवढ्यावरच थांबली तर सोलापूरकर कसले? ‘बोल, लॉन्ड्रीचे पैसे देऊ का?’ अखेर प्रकरण नेहमीप्रमाणे मुद्यावरुन गुद्यावर आले.
रस्त्यावरच्या बघ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटेपर्यंत मग हाणामारी झाली. हौस फिटेपर्यंत एकमेकांना बुकलून काढल्यानंतर, ‘पुन्हा भेट साल्या, तुला बघून घेतो’, अशा आणाभाका घेत मंडळी मार्गस्थ झाली. माझ्या माहितीतल्या एका मुलाला दुचाकीवरुन ट्रीपल सीट जाणाºया मुलांनी याच कारणावरुन मारहाण केली आणि त्याला अॅडमिट करुन उपचार करावे लागले. पोलीस तक्रार केल्यानंतर पोलीसच या मुलाला समजावून सांगत होते की रोडवर थुंकलं म्हणून कुणी का भांडायला जातं का? सर्वसामान्य व्यक्तींना रोडवर थुंकणे हा गुन्हा आहे हेच पटत नाही, या उलट तो त्यांना त्यांचा हक्कच वाटतो. मत देण्याचा अधिकार एकवेळ लोक बजावणार नाहीत, पण हा हक्क मात्र आवर्जून बजावतील, अशी परिस्थिती सोलापुरात तरी आहे.
- डॉ. सचिन जम्मा
(लेखक लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत)