Solapur: वाहत्या पाण्यासोबत बाहेर पडले कासव, सतर्क वन्यजीवप्रेमींनी वाचविले प्राण
By शीतलकुमार कांबळे | Published: July 5, 2024 07:21 PM2024-07-05T19:21:13+5:302024-07-05T19:21:30+5:30
Solapur news: छत्रपती संभाजी महाराज तलावातून एक कासव बाहेर आले. याची माहिती वन्यजीवप्रेमींना मिळाली. त्यांनी त्वरित कासवाला सुरक्षितरित्या पकडून पुन्हा तलावात सोडले. ' नाग' फाउंडेशनच्या सदस्यांनी ही कामगिरी केली.
- शीतलकुमार कांबळे
सोलापूर - छत्रपती संभाजी महाराज तलावातून एक कासव बाहेर आले. याची माहिती वन्यजीवप्रेमींना मिळाली. त्यांनी त्वरित कासवाला सुरक्षितरित्या पकडून पुन्हा तलावात सोडले. ' नाग' फाउंडेशनच्या सदस्यांनी ही कामगिरी केली.
मागील काही दिवसात शहरात पाऊस झाला. त्यामुळे तलाव पूर्णपणे भरला. अतिरिक्त झालेले पाणी विजयपूर रोड येथील पूलाकडून जाते. या पाण्याच्या प्रवाहासोबत एक कासव तलावातून बाहेर आले. तिथेच असलेल्या दर्ग्याच्या परिसरात कासव आले. हे पाहताच लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. कोण त्याला घरी घेऊन जाऊन पाळू म्हणत होतं तर कोण त्याला मारून टाका म्हणत होतं. ही कुजबुज ऐकताच दर्ग्यातील मेहबूब शेख बाहेर आले. त्यांनी कासवाला एका सुरक्षित ठिकाणी आणून ठेवले.
या घटनेची माहिती नाग फाउंडेशनचे सदस्य सिद्धेश्वर मिसालेलू यांना दिली. सिद्धेश्वर हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. उपस्थितांना कासवाचे जैवविविधतेमधील महत्व सांगितले. त्यानंतर पुन्हा तलावात सोडले.