Solapur tourism; सोलापुरी पर्यटनाचं ब्रँडिंग हवं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:23 PM2019-01-28T12:23:42+5:302019-01-28T12:26:12+5:30
विलास जळकोटकर सोलापूर : हजारो वर्षांची परंपरा असलेल्या सोलापूर जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक असा समृद्ध वारसा लाभलेला आहे. जिल्ह्याच्या आजूबाजूला ...
विलास जळकोटकर
सोलापूर : हजारो वर्षांची परंपरा असलेल्या सोलापूर जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक असा समृद्ध वारसा लाभलेला आहे. जिल्ह्याच्या आजूबाजूला असलेल्या मराठवाड्यातील तुळजाभवानी बरोबरच पंढरपूरचा पांडुरंग, अक्कलकोटचे स्वामी समर्थ देवस्थान हे धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. या जोडीलाच सोलापूर शहरानं गेली कित्येक वर्षे आपला आगळावेगळा ठसा जपला आहे. या सोलापुरी ब्रँडचं ब्रँडिंग तुम्ही, आम्ही, आपण करायला हवंय...
यात सर्वप्रथम सोलापूरचं दैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरानं नेहमीच बाहेरुन येणाºया पर्यटकांना नेहमीच भुरळ घातलेली आहे. १२ व्या शतकात हे मंदिर बांधल्याचं सांगण्यात येतंय.
अनेकांनी या मंदिराला सुवर्णमंदिराची प्रतिकृती म्हणूनही गौरवलं आहे. चहूबाजूला निळेशार पाणी आणि मधोमध असलेलं मंदिर सोलापूर शहराचं काय जिल्ह्याचं भूषण ठरलं आहे. परगावाहून येणारा पाहुणा एकदातरी हमखास या मंदिरात आल्याशिवाय राहत नाही. जाताना तो मनोमन सुखावतो अन् इतरांनाही या प्रेक्षणीय धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी उत्तेजीत करतो. आता या क्षेत्राकडं अधिकाधिक पर्यटकांनी आकर्षित व्हावं या दृष्टीनं मंदिर समितीनेही प्रयत्न चालवले आहेत. या जोडीला शहराच्या प्रत्येक नागरिकानंही आपल्याकडे येणाºया पै पाहुण्यांना आपल्या शहराचं वैभव सांगितलं पाहिजे. त्याचं ब्रँडिंग करायला पाहिजे.
भुईकोट किल्ला निश्चित केव्हा बांधला याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. कॅपेबल यांच्या मते बहामनी बादशहा महमदशहा यांच्या कारकिर्दीत इ. स. १३५८ ते १३७५ या दरम्यान बांधला असावा तर डॉ. हंटर म्हणतात १३४५ सालात तो बांधला. याशिवाय तोरो यांनी सचित्र महाराष्टÑ पुस्तकात किल्ल्याचा बाहेरील कोट इ.स. १३१३ मध्ये हसन गंगु बहामनी यांनी बांधला; मात्र आतील कोट हिंदू राजांनी १२ व्या शतकात बांधला अशी माहिती नमूद केली आहे. सोलापूरचे मल्लिकार्जुन पाटील यांनी हा किल्ला इ.स. १४५६ साली बांधला असे आपले मत नोंदवून ठेवले आहे. दुसरा महंमदशहा बहामनी (१४६६ ते १४८२) यांचा हुशार दिवाण महमद गवान याने सोलापूर व परांडा हे दोन्ही सारखीच बांधणी असलेले किल्ले एकाचवेळी बांधले असावेत असे काहींचे मत आहे.
संपूर्ण किल्ल्याची बांधणी एकाच काळात पूर्ण झाली नाही. त्यात वेळोवेळी विविध इमारतींची भर पडत गेली आणि फेरफार होत गेले ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. किल्ल्याच्या पहिल्या म्हणजे हत्ती दरवाजाचे दुरुस्तीचे व लोखंडी खिळे बसविण्याचे काम हा किल्ला इंग्रजांनी घेण्यापूर्वी आठ वर्षे अगोदर झाले होते. किल्ल्याच्या बांधकामात पूर्वीचे दगड इमारतीपैकी असून, त्यापैकी काही १२/१३ व्या शतकातील असावेत. किल्ल्यात हेमाडपंथी अवशेषही आहेत. असा हा सोलापूर वैभव असलेला हा किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे.
यानंतर महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयानंही नेहमीच सर्वांचं लक्ष वेधलंय. इथं बिबट्यांपासून ते मगर, काळविटं, हरीण, तरस, वन्यजीव पक्ष्यांच्या विविध प्रजाती बालगोपाळांना आकर्षण ठरताहेत. सुमारे पाच हजार एकराच्या सिद्धेश्वर वनविहारामध्ये नैसर्गिक बाज जपण्याचा प्रयत्न केलाय. पर्यटकांना आकर्षित करणारे सेल्फी पॉर्इंट, नैसर्गिक नाला, पशुपक्ष्यांची माहिती देणारं स्वतंत्र दालन इथं साकारलं आहे. वन औषधी झाडांचीही लागवड करण्यात आलेली आहे. पर्यावरणाची माहिती देणारी युको लायब्ररीही कार्यरत आहे. इथं सहलीच्या निमित्तानं येणाºया लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडण्याबरोबरच इथून परत जाणारा पर्यटक आनंद लुटण्याबरोबरच ज्ञानामृतही घेऊन जातो.
याशिवाय इथंली खाद्य संस्कृतीनंही आपला बाज कायम राखला आहे. इथं सोलापुरी कडक भाकरी, शेंगा चटणी बरोबरच बाहेरुन येणाºया पर्यटकांसाठी त्यांच्या प्रांतातली पदार्थही इथं आवर्जून मिळतात. आपली खासियत जपण्या बरोबरच या शहरानं बाहेरच्या खाद्य संस्कृतीलाही आपलंस केलं आहे.
असा समृद्ध वारसा जपणाºया शहराचं वैभव सातासमुद्रापार पोहवण्यासाठी आपण सोलापूरकरांनी एक पाऊल पुढं टाकायला हवं. खरय ना! चला तर मग...
ऐतिहासिक भुईकोट
या जोडीलाच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या शहरातला हा भुईकोट किल्ला महाराष्टÑातील प्राचीन दुर्गातील एक मानला जातो. आजही तो प्राचीन इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. सोलापूर शहराचे हे वैभव आहे.
स्मृती उद्यानाचा ठसा कायम
स्मृती उद्यानानंही आपला ठसा कायम ठेवलाय. इथं पर्यावरणप्रेमींनी या उद्यानाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या माता-पित्यांच्या स्मरणार्थ वेगवेगळ्या वृक्षांचे संगोपन केले आहे. सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी बैठे दालनही उघडले आहे. दर्दी रसिकजन येथे आवर्जून येतात. नव्या युगांच्या शिलेदारांना प्रेरणा मिळावी यासाठी येथे खगोलीय माहिती देणारी विज्ञानशाळाही कार्यान्वित आहे.