पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी गुरुवारपासून चार दिवस सोलापूर-तुळजापूर मार्ग वाहनांसाठी बंद
By विलास जळकोटकर | Published: October 21, 2023 04:44 PM2023-10-21T16:44:01+5:302023-10-21T16:48:09+5:30
कोजागरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यातून, शेजारच्या कर्नाटक राज्यातून पायी चालणाऱ्या देवी भक्तांची संख्या लाखोंच्या संख्येने असते.
सोलापूर : सोलापूरहूनतुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी चालत जाण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यादृष्टीने भाविकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी २६ ते २९ ऑक्टोबर या चार दिवसांसाठी सोलापूर-तुळजापूर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी इटकळ, वैराग, बार्शी हा पर्यायी मार्ग ठरवण्यात आला आहे.
कोजागरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यातून, शेजारच्या कर्नाटक राज्यातून पायी चालणाऱ्या देवी भक्तांची संख्या लाखोंच्या संख्येने असते. या काळात भाविकांना चालताना वाहनांचा अडथळा होऊ नये, यासाठी दरवर्षीप्रमाणे शहर पोलिस व ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने नियोजन आखले आहे. तसेच शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर हद्दीपर्यंत आणि पुढे ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने पोलिस आयुक्त डाॅ. राजेंद्र माने आणि जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेशा बंदोबस्ताची कुमक तैनात केली आहे. एरवी होणारी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी सोलापूर बोरामणीमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. हा बदल २९ ऑक्टोबरच्या रात्री बारापर्यंत अंमलात असणार आहे.
असा आहे पर्यायी मार्ग
ज्या भाविकांना पायी चालणे शक्य नाही, ते राज्य परिवहन महामंडळाची बस, तसेच खासगी वाहतुकीद्वारे देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला जातात त्यांच्यासाठी या चार दिवसांच्या कालावधीत सोलापूर ते तुळजापूर जाण्यासाठी बोरामणी, इटकळ, मंगरुळ पाटी या मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
- ज्यांना सोलापूरहून धाराशिवला जायचे आहे त्यांनी वैराग मार्गे जावे.
- ज्यांना सोलापूरहून लातूरला जायचे आहे त्यांनी सोलापूर, बार्शी, येडशी मार्गे मुरुड असा प्रवास करावा.
- छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या वाहनांसाठी सोलापूर, बार्शी, येरमाळा या मार्गाचा अवलंब करावा.
यांना या आदेशातून वगळले
वरील बंधने ही पोलिस, रुग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने व पोलिस ज्या वाहनांना परवानगी देतील, अशी वाहने व एसटी बसेस या वाहनांना लागू राहणार नाहीत. हा आदेश २६ ते २९ ऑक्टोबरच्या रात्री बारापर्यंत अंमलात राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीला शिक्षेस सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.