आडम मास्तरांकडून पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उल्लेख, नेमकं काय घडलं?
By दिपक दुपारगुडे | Published: January 19, 2024 04:06 PM2024-01-19T16:06:59+5:302024-01-19T16:07:55+5:30
यावेळी या कार्यक्रमात रेनगर प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांनी सभेसाठी आलेल्या नागरिकांना संबोधित भाषणात केलेल्या एका उल्लेखामुळे खुद्द मोदींसह एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांना आश्चर्याचा धक्काच बसला.
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापूरमधील कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचे लोकार्पण पार पडले. यावेळी मोदी यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पाच महिला लाभार्थ्यांना घर देण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमात रेनगर प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांनी सभेसाठी आलेल्या नागरिकांना संबोधित भाषणात केलेल्या एका उल्लेखामुळे खुद्द मोदींसह एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांना आश्चर्याचा धक्काच बसला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार, राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे असा उल्लेख त्यांनी करताच उपस्थितांमध्ये काही काळ हास्याची लकेर उमटली.
मात्र, झालेली चूक लागलीच लक्षात आल्यानंतर आडम यांनी यावर दिलगिरी व्यक्त करतानाच चूक दुरुस्तही केली. “माफ करा.. देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे नेहमी यायचे त्यामुळे त्या नावाची सवय झाली होती, असे ते म्हणाले.