सोलापूर विद्यापीठ शैक्षणिक सत्रांच्या तारखा जाहीर; शिक्षणशास्त्र, विधी सप्टेंबरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:12 PM2021-08-19T16:12:26+5:302021-08-19T16:13:58+5:30
अभियांत्रिकीच्या सत्रास ऑक्टोबरमध्ये सुरुवात
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नव्या शैक्षणिक सत्राच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाचे सत्र हे सप्टेंबर, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सत्राची सुरुवात ऑक्टोबर महिन्यापासून होत आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमाच्या सत्रास ऑगस्ट महिन्यातच सुरुवात झाली आहे.
कोरोनामुळे देशभरातील विद्यापीठांच्या २०२० पासूनच्या प्रवेश, परीक्षा, निकाल आदीचे वेळापत्रक बिघडले आहे. प्रवेश उशिरा झाल्यामुळे परीक्षा व निकालास उशीर लागत आहे. याचा परिणाम एकूणच शैक्षणिक सत्रांवर होताना दिसत आहे. शैक्षणिक सत्र २०२१-२२ हे जून-जुलै महिन्यात सुरु होणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मागील दोन वर्षापासून यास उशीर होत आहे.
कला, वाणिज्य, विज्ञान सामाजिक शास्त्रे (पदवी व पदव्युत्तर संलग्णित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले) एम.एस.डब्ल्यू. (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये) या अभ्यासक्रमाचे नवे सत्र हे एक ऑगस्टपासून सुरू झाले आहेत. या अभ्यासक्रमाची सत्र समाप्ती ३० नोव्हेंबर रोजी होईल.
शिक्षणशास्त्र (बी.एड., बी.पीएड., एम. एड., एम.पी.एड., एम.ए. एज्युकेशन, विधी (पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम) अभ्यासक्रमाच्या सत्रास एक सप्टेंबरपासून सुरुवात होत असून ३१ डिसेंबर रोजी सत्र समाप्त होणार आहे. अभियांत्रिकी, तांत्रिक, आर्किटेक्चर, फार्मसी, व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे सत्र (एम.बी.ए.) १ ऑक्टोबर रोजी सुरू होत असून ३१ डिसेंबर रोजी सत्र समाप्त होणार आहे.
----